चंदीगड, २१ फेब्रुवारी २०२४ : चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानेच चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीतील आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांना विजयी उमेदवार घोषित केले आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय खंडपीठाने सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. त्यावेळी रिटनिंग ऑफिसर अनिल मसीह यांनी केलेलं काम लोकशाही नियमाच्या विरुद्ध असल्याचं मत देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
चंदीगडमध्ये ३० जानेवारी रोजी महापौर पदासाठी मतदान झालं होतं. यामध्ये भाजपचे मनोज सोनकर यांना १६ तर आप आणि काँग्रेसचे संयुक्त उमेदवार कुलदीप कुमार यांना १२ मतं मिळाली होती. यावेळी अनिल मसीह यांनी एकूण ८ मतं अवैध ठरवली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही बाब उघड झाली होती. त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं.
चंदीगड महापालिकेत एकूण ३६ नगरसेवक आहेत. नगराध्यक्ष पदासाठी १९ मतांची आवश्यकता आहे. मात्र, ८ मतं बाद केल्याने मोठा गोंधळ उडाला होता. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या इतिहासात प्रथमच कोणा एका उमेदवाराला विजयी घोषित केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर