नवी दिल्ली, १७ जुलै २०२३ : दिल्लीतील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या संदर्भात केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाला ‘आप’ सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासंदर्भातील खटला आता घटनापीठाकडे सुपूर्द करण्याचे संकेत खंडपीठाने दिले आहेत.
अध्यादेशाला राज्यसभेत आव्हान देण्याचा निर्णय याआधीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. काँग्रेसने नुकताच या मुद्द्यावर आप ला समर्थन देण्याचा निर्णय जाहीर केला होता. दुसरीकडे न्यायालयातही हे प्रकरण प्रलंबित असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जुलै रोजी होणार आहे.
सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांवर उपराज्यपालांचेच नियंत्रण राहील, असे सांगत केंद्र सरकारने मे महिन्यात अध्यादेश जारी केला होता. विशेष म्हणजे हा अध्यादेश येण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्यांवर दिल्ली सरकारचे नियंत्रण राहील, असा आदेश दिला होता.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर