Pahalgam Terror Attack : सुप्रीम कोर्टाने पाहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे व इतर उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या जनहीत याचिकेवर गुरुवारी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत ती याचिका फेटाळली.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन.के. सिंह यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान याचिकाकर्ता फतेश साहू यांना फटकारले आणि म्हटले, ही दहशतवादाविरुद्धच्या लढ्याची निर्णायक वेळ आहे. सशस्त्र दलांचे मनोबल खचवू नका,विषयाची संवेदनशीलता समजून घ्या. न्यायालयांचा उद्देश वाद सोडवणे हा आहे चौकशी करणे नव्हे. आम्ही न्यायनिर्णय देतो, चौकश्या करीत नाही. माजी न्यायाधीशांकडून चौकशीची मागणी योग्य नाही,असेही न्यायालयाने नमूद केले.
तथापि, याचिकाकर्त्याच्या वतीने वकिलांनी काश्मीरी विद्यार्थ्यांसाठी काही तरी सुरक्षा उपायांची मागणी करत सांगितले की, जम्मू-काश्मीरबाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किमान काही तरी संरक्षण असावे.या मागणीवर खंडपीठाने कठोर प्रतिक्रिया दिली. सुरुवातीला चौकशी, मग नुकसानभरपाई, नंतर प्रेस कौन्सिलसाठी निर्देश आम्हाला रात्री हे सर्व वाचावे लागते आणि आता विद्यार्थ्यांबाबत याचिका? हे तर्कसंगत आहे का? असा सवाल करत न्यायालयाने याचिका मागे घेण्याचा सल्ला दिला.
यानंतर याचिकाकर्त्याने ती मागे घेतली. न्यायालयाने यास अनुमती दिली आणि संबंधित उच्च न्यायालयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत दाद मागण्याची मुभा दिली.दरम्यान ,सुप्रीम कोर्टात सध्या संवेदनशील पर्वतीय राज्यांतील सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी आणखी एक जनहित याचिका प्रलंबित आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,राजश्री भोसले