नवी दिल्ली, २८ जुलै २०२३ : राजधानी दिल्लीतून मिळालेल्या वृत्तानुसार, दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करणार आहे. कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित सीबीआय आणि ईडी प्रकरणात जामिनासाठी सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोन आदेशांना आव्हान देत पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. खरे तर उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्याकडे उत्पादन शुल्क खातेही होते. सीबीआय भ्रष्टाचार प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले होते की, सिसोदिया हे शक्तिशाली व्यक्ती आहेत आणि जर ते बाहेर आले तर ते साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात.
सीबीआयने त्यांना ‘दिल्ली दारू घोटाळ्यात’ कथित भूमिकेसाठी २६ फेब्रुवारी रोजी प्रथमच अटक केली आणि तेव्हापासून ते कोठडीत आहेत. २८ फेब्रुवारी रोजी त्यांनी दिल्ली मंत्रिमंडळाचा राजीनामाही दिला होता.
दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) यांनी नवीन दारू धोरणानंतर बाहेर पडलेल्या निविदांबाबत सीबीआय चौकशीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर एलजी कार्यालयाकडून या प्रकरणावर असे सांगण्यात आले की, जाणूनबुजून केलेल्या चुकांमुळे सिसोदिया यांची भूमिका संशयास्पद आहे, कारण २०२१-२२ च्या मद्य परवानाधारकांच्या निविदेत १४४ कोटींची बेकायदेशीर पूर्तता झाल्याचे प्राथमिक तपासात कळते आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड