‘त्या’ बॅनरवरुन सुप्रिया सुळे संतापल्या; केली ‘ही’ मागणी

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२३ :राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयासमोर भावी मुख्यमंत्री या आशयाचे नेत्यांचे पोस्टर लावण्याचा सिलसिला आज देखील सुरु आहे. सर्वात पहिल्यांदा जयंत पाटील, मग अजित पवार आणि त्यांच्यानंतर आज सुप्रिया सुळे यांच्या नावाचे बॅनर झळकले.

खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो भावी मुख्यमंत्री म्हणूनलावण्यात आला. त्या फोटोवरुन सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या आहेत. महिलेचा फोटो कुठेही वापरता येत नाही आणि फोटो लावण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्यातील गावभेटीच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्या बोलत होत्या.

  • काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

बॅनरवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एकतर बॅनर कोणी लावला? हा पुरावा असला पाहिजे. कोणी कोणाचे बॅनरवर फोटो लावले पाहिजेत, याचा कोणाला अधिकार नाही. एका महिलेचा फोटो बॅनरवर लावण्याचा कुणाला अधिकार नाही. आज माझा फोटो लावला आहे, उद्या तुमच्या घरातील मुलींचा फोटो लावला जाऊ शकतो. त्यामुळे माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की, दादांचा आणि माझा फोटो कोण लावतोय? पहाटेच हा बॅनर का लागला जातो? आमच्या दोघांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे या मागे कोण आहे? याची चौकशी करून, कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी मुंबई पोलिसांकडे केली आहे.

  • नेमके बॅनरवर काय लिहिले ?

महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. सुप्रियाताई सुळे. नाद नाय करायचा! असा मजकूर या बॅनरवर लिहिला होता. तसेच या बॅनरवर सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्याचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही फोटो आहे. तर यापूर्वी लावण्यात आलेल्या अजित पवारांच्या बॅनरवर ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री…, एकच दादा, एकच वादा, अजित दादा…’ अशा आशयाचा मजकूर या लिहिलेला होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा