हडपसर ते लोणंद पालखी मार्गामध्ये आपण स्वतः लक्ष घालावे, नितीन गडकरी यांना सुप्रिया सुळे यांची ट्विटरच्या माध्यमातून विनंती

मुंबई, १७ जुलै २०२३ : काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून राजकीय भूकंप घडवून आणला. त्यानंतर ते भाजपबरोबर सत्येमध्ये सामील झाले आणि उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. मागील काही दिवसात राज्याने अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या. एकीकडे राज्याचे राजकारण वेगळ्या वळणावर असताना सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विनंती केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या हडपसर ते लोणंद पालखी मार्गासंबंधित त्यांनी थेट ट्विटरच्या माध्यमातून विनंती केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या हडपसर ते लोणंद या पालखी महामार्गाचा भाग असणारा हडपसर ते झेंडेवाडी या मार्गाची अद्याप निविदा निघाली नाही. दिवे घाटातून जाणारा हा मार्ग वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने वन विभागाच्या परवानगीची अडचण होती. परंतु हा विषय देखील मार्गी लागला असून सुधारित प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

नागरीकांच्या सुविधा लक्षात घेता हा मार्ग लवकरात लवकर पुर्ण होणे गरजेचे आहे. याबाबतच्या सर्व अडचणी दूर झालेल्या असून हे काम तातडीने सुरु करण्याची नितांत गरज आहे. यासंदर्भात माझी रस्ते व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांना विनंती आहे की कृपया या संदर्भात आपण सकारात्मक विचार करुन या मार्गाची निविदा काढण्याचे आदेश द्यावेत, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे. तसेच नितीन गडकरी यांना टॅग केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा मार्ग अवलंबल्यानंतर सुप्रिया सुळे यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला होता. वडिलांबाबत चुकीचे ऐकून घेणार नाही असे त्या म्हणाल्या होत्या. आता अजित पवार गटाने पुन्हा एकदा शरद पवार यांच्याशी चर्चेचा मार्ग अवलंबल्याने राज्याच्या राजकारणात नवा अंक पाहायला मिळेल अशी चर्चा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा