आरोपांच्या वादळानंतर सुरेश कलमाडी निर्दोष; कार्यकर्त्यांचा निवासस्थानासमोर जल्लोष!

19
Suresh Kalmadi Supporters Celebrate Outside Residence
सुरेश कलमाडी निर्दोष;

Suresh Kalmadi Supporters Celebrate Outside Residence: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कथित घोटाळ्यांच्या आरोपांनी वादग्रस्त ठरलेले पुणे शहराचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांची अखेर निर्दोष मुक्तता झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतल्याने, त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. काल (गुरुवारी) ही बातमी शहरात पसरताच, कार्यकर्त्यांनी कर्वे रस्त्यावरील कलमाडी यांच्या निवासस्थानासमोर एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत आणि घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्यावरील आरोपांचे खंडन झाल्याचा आनंद व्यक्त केला.

पुणे फेस्टिवल आणि पुणे मॅरेथॉन यांसारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांच्या माध्यमातून सुरेश कलमाडी यांनी पुणे शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली होती. तब्बल पंधरा वर्षांनंतर त्यांच्यावरील आरोपांचे सावट दूर झाल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र, स्वतः सुरेश कलमाडी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते कार्यकर्त्यांना भेटू शकले नाहीत, असे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि पत्रकारांना कळवले. तरीही, सचिन आडेकर, संदीप मोकाटे, राजू मगर, नरेंद्र काते, भगवान कडू, संताजी खामकर, अण्णा गोसावी, आबा जगताप, अतुल गोंजारी या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानासमोर एकत्र येत आपला आनंद व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी सांगितले की, नेत्याला आराम मिळावा यासाठी त्यांनी भेटीचा आग्रह धरला नाही, परंतु १ मे रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ते नक्कीच भेटून शुभेच्छा देणार आहेत.

कलमाडी यांचे क्रीडा क्षेत्रातील निकटवर्तीय अॅड. अभय छाजेड आणि त्यांच्या विविध उपक्रमांतील सहकारी संगीता तिवारी यांनीही या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या आरोपांमुळे सुरेश कलमाडी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीला काहीसा ब्रेक लागला होता. काँग्रेस पक्षानेही याच कारणामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती, ज्यामुळे ते काही काळ राजकीयदृष्ट्या सक्रिय नव्हते. पुणे फेस्टिवल वगळता ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही फारसे दिसत नव्हते.

या निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, “भाजपने अनेक कारस्थाने करून कलमाडी यांच्यावर खोटे आरोप लावले होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही त्यांनी त्रास दिला होता. अखेर ‘सत्यमेव जयते’ हेच खरे ठरले आणि कलमाडींवरील आरोप निराधार ठरल्याने भाजपचा बुरखा फाटला आहे.”

कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि नेत्यांवरील आरोपांचे निराकरण यामुळे काँग्रेसच्या गोटात नवचैतन्य निर्माण झाले आहे. आता सुरेश कलमाडी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात दिसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे