

From laborer to Chief Justice A journey of Suresh Kait: मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांनी मंगळवारी (२० मे) त्यांच्या निरोप समारंभात भावपूर्ण भाषण दिले. त्यांनी स्वतःच्या कष्टमय बालपणापासून न्यायालयातील महत्त्वाच्या पदापर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मी माझ्या आयुष्यात मजूर म्हणून काम केले पण जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमी यावरून कुणाशीही वेगळे वागलो नाही.” ते म्हणाले की हे सगळं त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे शक्य झालं.
न्यायालयातील प्रलंबित खटल्यांविषयी बोलताना न्यायमूर्ती कैत यांनी चिंता व्यक्त केली. “या उच्च न्यायालयात सुमारे ४.८० लाख खटले प्रलंबित आहेत. मंजूर न्यायाधीशांची संख्या ५३ असून सध्या फक्त ३३ न्यायाधीश कार्यरत आहेत. त्यामुळे मी न्यायाधीशांची संख्या ८५ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे असे त्यांनी सांगितले. न्यायालयीन कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कायद्याच्या शिक्षणाची सुरुवात त्यांच्या शालेय जीवनापासून झाली. ते म्हणाले की, मी अशा शाळेत शिकलो जिथे वर्ग नव्हते आम्ही झाडाखाली बसून अभ्यास करायचो. माझे पालक शेतमजूर होते आणि मीही १०वी पर्यंत मजुरी केली. न्यायमूर्ती कैत यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि १९८९ मध्ये वकिलीची नोंदणी केली. त्यांनी केंद्र सरकार, UPSC आणि रेल्वेसाठी वरिष्ठ वकील म्हणून काम केले. २००८ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर तेलंगणा-आंध्रप्रदेश न्यायालयात काम केले आणि अखेर २५ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाले.
न्यायालयीन सुविधांच्या सुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत बोलताना ते म्हणाले की जिल्हा न्यायालय संकुल, न्यायाधीशांच्या निवासस्थानांची उभारणी बालमित्र न्यायालये यांसारख्या सुधारणांमुळे नागरिकांना न्यायप्रक्रियेत मोठा लाभ होईल.मुख्य न्यायमूर्ती कैत यांचा हा जीवनप्रवास आणि त्यांच्या कार्यकाळातील सुधारणा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित न्यायव्यवस्थेच्या आदर्शांचे पालन करणारा आहे, ज्यामुळे न्यायव्यवस्थेतील गुणवत्तेचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,राजश्री भोसले