वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘सर्वायव्हर सपोर्ट’, पुण्यातील कनेक्टिंग ट्रस्ट चा उपक्रम

पुणे, ९ सप्टेंबर २०२२ : गेल्या 17 वर्षांपासून आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देण्याचे काम पुण्यातील कनेक्टिंग ट्रस्ट ही संस्था करत आहे. वाढती बेरोजगारी, नातेसंबंधातील तणाव, सोशल मीडियासह अन्य गोष्टीचे व्यसन, तुटलेला संवाद, त्यातून आलेले एकाकीपण आणि नैराश्यातून थेट आत्महत्येचे पाऊल उचलले जाते. आत्महत्येच्या या विचारापासून परावृत्त करण्यासाठी ‘कनेक्ट’ महत्वाचा असतो.
तणावग्रस्तांना भावनिक आधार देण्याबरोबरच आत्महत्येचा प्रयत्न करूनही वाचलेल्या व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय, आत्महत्या घडलेल्या घरातील व्यक्ती आणि नातेवाईक यांना धक्का बसलेला असतो व सावरण्यासाठी आधाराची गरज असते, हे ओळखून ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ने ‘सर्वायव्हर सपोर्ट’ नावाचा उपक्रम सुरु केला आहे.

‘कृतीतून आशा जागवूया (क्रिएटिंग होप थ्रू ऍक्शन) हा नारा देत ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ काम करत आहे. मानसिक आरोग्यात, विशेष करून आत्महत्या प्रतिबंधाचे काम करण्यासाठी २००५ मध्ये ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. नकारात्मकता, अपमान, भेदभाव, वैद्यकीय आणि कायदेशीर चौकशी अशा अनुभवांचा माणसाच्या मनावर आघात होतो आणि त्यातून आत्महत्येचा विचार येतो. अशावेळी त्यांना भावनिक आधार मिळाला, मन मोकळे करता आले तर त्यातून या व्यक्ती स्वतःला सावरू शकतात.

व्यक्त होण्यासाठी, मन मोकळे करण्यासाठी कोणी माणूस मिळाला नाही, तर भावनांचा कोंडमारा होतो. व्यक्ती मनाने ढासळते आणि सगळं असह्य झाल्यावर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचललं जात. पण जर त्यापूर्वी त्यांना मन मोकळे करता आले, भावनां सांगता आल्या व भावनिक आधार मिळाला तर अशा व्यक्ती सावरू शकतात व टोकाचे पाऊल उचलण्यापासून परावृत्त होऊ शकतात आणि एक जीव वाचू शकतो. या करिता ‘कनेक्टिंग’तर्फे डिस्ट्रेस हेल्पलाईन चालू करण्यात आलेल्या आहेत.

९९२२००४३०५/९९२२००११२२ या क्रमांकांवर तणावग्रस्त व्यक्ती बोलू शकतात. आठवड्याचे सातही दिवस, दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत संपर्क करता येतो. किंवा ८४८४०३३३१२ या नंबरवर एसएम्एस पाठवु शकतात. संस्थेकडून त्यांना फोन येतो व फोनवर बोलण्याची वेळ ठरवली जाते. ही सेवा दर बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी उपलब्ध असते. आणि ई-मेल द्वारे मदत मागण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. connectingngo@gmail.com या ई-मेलद्वारे सल्लाही दिला जातो. यात तणावग्रस्त व्यक्तीची ओळख व माहिती गुप्त ठेवली जाते.

आत्महत्या प्रतिबंधासाठी कनेक्टिंग ट्रस्टबरोबर काम करू इच्छिणाऱ्यांनी अक्षत भयाणी यांना 7030230033 वर संपर्क साधावा
जीवन वाचवणे खूप समाधानाचे काम आहे.अनेकांना आधाराची गरज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा