मुंबई, २ ऑगस्ट २०२० : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरण आता वेगळ्याच वळणार जाताना दिसत आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास सध्या मुंबई पोलीस करत आहेत. मात्र सुशांतच्या वडिलांनी बिहारमधे सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर नोंदवली आणि इथूनच नव्या वादाला आणि राजकारणाला सुरुवात झाली. सुशांत सिंग राजपूत हा मूळचा बिहारचा असून एका सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा होता. अभिनयाची आवड असलेल्या सुशांतनं टीव्ही सिरीयल “पवित्र रिश्ता” मधून छोट्या पडद्यावरून पदार्पण केलं आणि अनेकांचं मन जिंकलं. त्यानंतर काई पो चे, एम. एस. धोनी, केदारनाथ ही त्याची चित्रपटं प्रचंड गाजली आणि तो एक स्टार म्हणून नावारूपाला आला.
१४ जून २०२० रोजी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात त्यानं गळफास लावून आत्म्हत्या केल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्यानं आत्महत्या का केली? याबद्दल अनेक उलट – सुलट चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर दिग्दर्शक करण जोहर याच्या एका पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आणि बॉलीवूडमधील ”नेपोटीझम”ची चर्चा सुरु झाली. अभिनेत्री कंगना रानौत ने एक व्हिडीओ पोस्ट करत सुशांतच्या आत्महत्येला बॉलिवूडमधील काही लोक जबाबदार असल्याचं खळबळजनक वक्तव्य करत एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी यावर आपली मते मांडायला सुरुवात केली, आणि इथूनच बॉलीवूडमध्ये दोन गट निर्माण झाले.
मुंबई पोलिसांतर्फे अनेकांच्या चौकाशीचे सत्र सुरु झाले. तर अनेक नेते आणि राजकारणी याबाबत आपली भूमिका जाहीर करू लागले. ३० जुलै रोजी भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सुशांतची हत्या झाली असल्याची शंका उपस्थित करत काही कागदपत्रे ट्विटरवर शेअर केल्याने नवा वाद निर्माण झाला. अनेक भाजप नेते आजही सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास हा सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी करत आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही हा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी जनतेची भावना असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याचप्रमाणे ईडीने देखील याबाबात स्वतः पुढे येत गुन्हा नोंदवावा असं आवाहन केलं होत.
बिहारमध्ये रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलीस तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र आता मुंबई पोलीस तपासात सहकार्य करत नसून कामात अडथळा आणत असल्याचं बिहार पोलीस बोलत आहे. त्याचप्रमाणे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी थेट महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले आहे. ठाकरे सरकारवर टीका करत ते म्हणाले कि, उद्धव ठाकरे हे बॉलीवूड माफिया आणि काँग्रेसच्या दबावात येऊन काहींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्ष बिहारमधील जनतेला काय उत्तर देणार असा टोलाही त्यांनी लगावला आहे. सोबतच बिहारच्या सुपुत्राला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ असंही हे म्हणाले.
आता बिहार पोलीसही मुंबई पोलिसांवर तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे अगोदर महाराष्ट्र सरकार विरद्ध बिहार सरकार हा वाद आणखी चिघळला असून तो मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असाही झाला आहे. त्यामुळे आता दोन राज्यांचे सरकार आमनेसामने आले असल्याचं चित्र आहे. दुसऱ्या राज्यात पळून गेलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी इंटरस्टेट को-ऑर्डिनेशन कमिटी एकत्र काम करत असते. त्यामुळे देशभरातील विविध राज्यातले पोलीस हे एकमेकांना सहकार्य करत असतात. मात्र सुशांत सिंग प्रकरणामुळे बिहार आणि मुंबई पोलीस यांच्यात दरी निर्माण झाली असल्याने भविष्यात बिहार पोलीस देखील भविष्यात मुंबई पोलिसांना सहकार्य करणार नसल्याची शक्यता आहे असे दबक्या आवाजात बोललं जातंय.
महाराष्ट्र सरकारने याआधीच सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्यास नकार दिला होता. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याअगोदरच सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मुंबई पोलिसांची बाजू घेत मुंबई पोलीस तपासासाठी सक्षम असल्याचं सांगत मुंबई पोलिसांवर बोट उचलणे म्हणजे कोविड योद्ध्यांवर बोट उचलण्यासारखं आहे असं मत व्यक्त केलं होत. दरम्यान सुशांतच्या बहिणीने ”या प्रकरणचा योग्य तपास व्हावा आणि आम्हाला न्याय मिळावा” अशी विनंती थेट पंतप्रधान मोदींना ट्विटरवर केली आहे.
एकूणच पाहता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणाला राजकीय रंग लागला असून त्यावर राजकारण तापलं आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या तपासापेक्षा महाराष्ट्र विरुद्ध बिहार, मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस, बॉलीवूड विरुद्ध बॉलीवूड, नेपोटीझम यांसारख्या अनेक मुद्द्यांच्या चर्चा आणि राजकारण होताना दिसत आहे. मात्र या सगळ्यात सुशांतच्या आत्महत्येचं गूढ अजूनही कायम आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे.