मुंबई, १९ ऑगस्ट २०२२: महाराष्ट्रातील रायगडमध्ये शस्त्रांनी भरलेली बोट सापडलीय. बोटीत तीन एके-47, गोळ्यांसह काही स्फोटकेही सापडली आहेत. त्याचा संबंध दहशतवादी कारस्थानाशी जोडला जातोय. सध्या एटीएस प्रत्येक कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान, रायगड मध्ये आणखी एक बेवारस बोट सापडली असून, त्याचीही चौकशी सुरू आहे.
संशयास्पद बोट कोणाची आहे, असे वेगवेगळे दावे केले जात होते. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी सांगितल्या आहेत. ही बोट ऑस्ट्रेलियातील एका महिलेची असून, खराब झाल्यानंतर ती भारताच्या किनाऱ्यावर गेली असल्याचं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री म्हणाले की, सध्या कोणत्याही दहशतवादी कोनाची पुष्टी झालेली नाही.
३ AK47 रायफल
त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य आले आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले की, मच्छिमारांना १६ मीटर लांबीची एक बेवारस बोट सापडली आहे. त्यांनी याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली. रायगड येथून सापडलेल्या संशयास्पद बोटीत ३ एके ४७ रायफल आणि स्पोटके सापडल्याचं त्यांनी सांगितलं. ते वॉटरप्रूफ बॉक्समध्ये ठेवले होते. सध्या एटीएस आणि तटरक्षक दल या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
लेडी हान असं या बोटीचं नाव असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्याची मालक ऑस्ट्रेलियाची एक महिला आहे. तिचा नवरा या बोटीचा कॅप्टन आहे. ही बोट मस्कत (ओमान) येथून युरोपच्या दिशेने जात होती.
२६ जून २०२२ रोजी या बोटीचं इंजिन खराब झालं होतं. त्या बोटीवरील लोकांनी वाचवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कोरियाच्या नौदलाने या सर्व लोकांना जहाजातून वाचवलं आणि नंतर ओमानमध्ये सोडलं. मात्र भरती-ओहोटीमुळं ही बोट ओढण्यात आली नाही. त्यानंतर ही बोट आता हरिहरेश्वर बीचवर किनाऱ्यावर आलीय.
ही बोट जिथे सापडली आहे ते ठिकाण मुंबईपासून २०० किमी आणि पुण्यापासून १७० किमी अंतरावर आहे.
सध्या ही बोट कुणाची आहे, याचं उत्तर सरकारने दिलंय. पण त्यात शस्त्रं का ठेवण्यात आली? त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, MY लेडी हान बोटीला नेपच्यून P2P ग्रुपने खासगी सुरक्षा पुरवल्याचंही समोर आलंय. मात्र अरबी समुद्रात पावसाळ्यात ही बोट खराब झाली. त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत कॅप्टन आणि इतर कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आलं पण धोकादायक हवामानामुळे बोट बाहेर काढता आली नाही.
ही बोट समुद्रात बुडाली असावी, असा कंपनीचा अंदाज होता. पण आता ती भारतीय किनारपट्टीवर पोहोचलीय. आता नेपच्यून पी2पी ग्रुप आणि या बोटीचे मालक भारत आणि यूकेच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. जेणेकरून बोट आणि त्यात सापडलेला माल परत मिळवता येईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे