कोल्हापूर, ३१ मे २०२३: वडणगे तालुका करवीर येथील दिंडे कॉलनीमध्ये राहणारे मधुकर दिनकर कदम वय ५९ व जयश्री कदम या दाम्पत्याचा आज सकाळी संशयास्पद मृत्यू झाला मधूमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच रिअॅक्शन येऊन या पती-पत्नीचा मृत्यू झाला असावा. अशी शक्यता या दांपत्याच्या मुलींनी वर्तवली आहे. दोघांचाही व्हीसेरा राखून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी दोघांनी मुक्त सैनिक वसाहत येथील एका डॉक्टरकडून आयुर्वेदिक औषध घेतले होते. आज सकाळी दोघांनी औषधी पावडर पाण्यात मिसळून घेतली. त्यानंतर मधूकर कदम हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले आणि त्यांच्या पत्नी स्वयंपाक करत होत्या. काही वेळातच जयश्री कदम यांना अस्वस्थ वाटू लागले व त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर काही वेळात त्या बेशुद्ध पडल्या.
दूध आणण्यासाठी शिवपार्वती चौकातील डेअरीत गेलेले मधूकर कदमही चक्कर येऊन पडल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांनी कदम दांपत्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही सीपीआरमध्ये पाठवलं. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत्यू झाल्याचे सांगितले. या दाम्पत्याला गायत्री वय १९ आणि विजया वय १७ या दोन मुली आहेत. आई-वडीलांच्या अचानक मृत्यूमुळे दोन्ही मुलींना धक्का बसला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर