नाशिक, दि. २८ एप्रिल २०२०: घरातील टाकाऊ पाईप आणि भोंगा एकमेकाला जोडलेला… तराजूजवळ भोंग्याचे तोंड तर त्याला जोडलेल्या पाईपाचे दुसरे तोंड ग्राहकाच्या पिशवीजवळ…सगळ्यांना उभे राहण्यासाठी रिंगण…शांततेत होत असलेले धान्य वितरण सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेचे पालन करीत स्वस्त धान्य दुकानाबाहेरचे हे चित्र आहे इगतपुरी तालुक्यातील मानवेढे या अतिदुर्गम गावातल्या महिला संचालित रेशन दुकानातील. रेशन दुकानदार पोर्णिमा भागडे यांनी ही अनोखी शक्कल लढवून सोशल डिस्टन्सचे अनोखे उदाहरण राज्यातील जनतेला दाखवून दिले आहे.
लॉकडाऊनमध्ये अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात असल्याच्या बातम्या कानावर पडतात. किराणा दुकानांवर गर्दी उसळत आहे. मात्र अशाही परिस्थितीत मानवेढे या पुनर्वसित अतिदुर्गम गावातील स्वस्त दुकानदार महिलेने स्वयंप्रेरणेने ‘सोशल डिस्टन्स’ राखण्यासाठी अभिनव उपक्रम राबविला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ असणारी धान्य वितरण करणारी यंत्रणा तयार करून सोशल डिस्टन्सिंगला या महिला दुकानदाराने एकप्रकारे बळ दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धान्य दुकान म्हटले, की एक प्रतिमा आपोआप डोळ्यासमोर उभी राहते. गर्दी, गोंधळ आणि गैरसोय. त्यातच आता कोरोनाचे सावट इतके दाट झाले आहे की, नागरिकांच्या सततच्या संपर्कात सामाजिक अंतर राखले जात नाही. परिणामी कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची दाट शक्यता असते.
स्वस्त धान्य दुकानदार पौर्णिमा भागडे यांच्या म्हणण्यानुसार, लाभार्थ्यांची धान्य दुकानात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेवून सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे पालन करण्यासाठी माझ्या कुटूंबातील सर्वांनी कंबर कसली. यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे.
या अनोख्या प्रयोगामुळे शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे उत्स्फूर्तपणे पालन होत असून, एक स्तुत्य उपक्रम असल्याचे इगतपुरीच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले. गावातील या प्रयोगामुळे कोरोनाला चांगल्या पद्धतीने प्रतिबंध करता येवू शकणार आहे.