टेंभुर्णी, सोलापूर २१ डिसेंबर २०२३ : सोलापूर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी एनटीपीसी सोलापूर यांचे पंप हाऊस उजनी (टें) या ठिकाणी आहे. सन २०१२ ला या पंपाचे काम चालू झाले. सन २०१६ ला पंप हाउसचे काम पूर्ण होऊनही उजनी ते पंप हाउस पर्यंतचा रस्ता बारा वर्षे खराब अवस्थेत आहे. हा रस्ता त्वरित व्हावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निलेश मेटे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९ डिसेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आंदोलन आणि रस्त्याबाबतचे निवेदन तहसीलदार माढा आणि माजी खासदार राजू शेट्टी तसेच पोलीस निरीक्षक टेंभुर्णी यांना देण्यात आले आहे.
उजनी ते पंप हाऊस पर्यंतचा रस्ता खराब आहे. त्यावरून हजारो ट्रक, ट्रेलर, अवजड वाहनाची वाहतूक या रस्त्यावरून होते. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे आहेत. वारंवार मागणी करूनही रस्त्याचे काम करण्यात आले नाही. अधिकारी रस्ता करण्याचे फक्त आश्वासन देत आहेत. एनटीपीसी यामध्ये लक्ष घालण्यास अनुकूल दिसत नाही. सध्या पंप हाऊस हा पूर्ण क्षमतेने चालू असून एनटीपीसी रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. एनटीपीसी कडे जाणारा रस्ता हा शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेला आहे. तरी या शेतकऱ्यांच्या मुलांना एनटीपीसी मध्ये नोकरी मिळावी. त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निलेश हरिदास मेटे यांनी दिले आहे.
त्या अनुषंगाने निलेश मेटे यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे ते १९ डिसेंबर पासून आमरण उपोषणास बसले आहेत. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रताप मिसाळ, बापू कोकाटे, विष्णू कुंभार, माऊली चंदनकर, प्रमोद चंदनकर, भारत घाडगे, सुरेश पाटील, दिलीपराव पाटील, संतोष पाटील, नानासाहेब मेटे, ज्योतीराम मेटे, सोमनाथ तनपुरे, बाळासाहेब पाटील याचबरोबर स्थानिक ग्रामस्थ उपोषणा स्थळी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील म्हणाले की महाराष्ट्रात सर्वात मोठा पाणीसाठा असलेल्या उजनी धरणाच्या स्थापनेपासूनच धरणग्रस्तांवर अन्याय झाला आहे.तसेच याठिकाणी अनेक अवजड वाहने येत असून कुठल्याही प्रकारची साधी दुरूस्ती केली जात नाही आणि आताही सोलापूर महानगरपालिका पंप हाऊस, धाराशिव पंप हाऊस, एनटीपीसी पंप हाऊस यांसारख्या प्रकल्पात स्थानिक कामगारांना डावलून बाहेरच्या लोकांना नौकरी दिली जाते यापुढे असा अन्याय सहन केला जाणार नाही अन्यथा यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी :प्रदीप पाटील