चिकोडी, बेळगाव ८ जुलै २०२३: चिकोडी जवळील हिरेकोडी पर्वतावरील जैन आश्रमाचे स्वामी आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची हत्या झाल्याचं निष्पन्न झाले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून, मुनींची हत्या कुणी आणि का केली? या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. पैशाच्या व्यवहारातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्वामींचा खून आश्रमातच करून मृतदेह दूरवर नेऊन फेकण्यात आलाय. काहीजणांनी स्वामीकडून उसने पैसे घेतले होते. ते पैसे स्वामींनी परत मागितल्याने त्यांचा खून केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी आज सकाळी चिकोडीजवळच्या खटकभावी गावाला भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली.
स्वामी बेपत्ता झालेल्या दिवशी तसेच त्यांच्या आदल्या दिवशी आश्रमाला कोणी कोणी भेट दिली होती, याचाही पोलीस बारकाईने तपास करत आहेत. मृतदेह अजून सापडलेला नाही. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी खटकभावी गावच्या शिवारात मृतदेह फेकल्याचे सांगितले. मात्र शिवारात पहाटेपासून शोधकार्य सुरू असून मृतदेह सापडलेला नाही.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर