गोल पोस्ट इतर इतिहास स्वराज्य स्थापनेचा प्रारंभ करणारे शहाजीराजे भाग १

स्वराज्य स्थापनेचा प्रारंभ करणारे शहाजीराजे भाग १

स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांच्या जीवनाचा आपण या लेखात आढावा घेणार आहोत. लेख थोडा मोठा झाला आहे. एक गोष्ट इथे नमूद करूषी वाटते की जेव्हा इतिहासाचे लिखाण कथानकाच्या स्वरूपात केले जाते तेव्हा ते वाचण्यास सोपे जाते कारण ते कंटाळवाणे वाटत नाही. जसे की कादंबरी वगेरे, परंतु अभ्यास म्हणून किंवा माहिती म्हणून जे लिखाण केले जाते ते थोडे कंटाळवाणे वाटू शकते. हे सांगण्याचे कारण म्हणजे हा लेख तसाच असणार आहे कंटाळवाणा वाटेल परंतु महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. हा लेख अर्धाच आहे याचा पुढील भाग दोन दिवसात टाकेल.

मालोजीना शहाजी आणि शरीफजी असे दोन मुलगे होते. शहाजी इ. स. १५९४ व शरीफजी इ. स. १५९७ मध्ये वेरूळ येथे जन्मले. मालोजीराजे इ. स. १६०६ मध्ये निवर्तले. त्यावेळी शहाजीराजे अवघे पाच वर्षाचे होते. शहाजी आणि शरीफजी या आपल्या दोन मुलांचे संगोपन त्यांची मातोश्री उमाबाई हीने मोठ्या दक्षतेने केले. मालोजींचा भाऊ विठोजी यानेही आपल्या दोन्ही पुतण्यांच्या संरक्षणाचा भार आपल्या शिरावर घेतला. आणि दौलतीचा सांभाळ चांगल्या रीतीने केला. यावेळी दक्षिण देशासह सारा हिंदुस्तान आपल्या छत्राखाली आणण्याची अकबर बादशहाचीbमहत्त्वाकांक्षा होती. दक्षिणेत इ. स. १५९४ मध्ये अहमदनगरचा बुन्हाण निजामशहा मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर निजमाशाही दरबारांत सत्तेसाठी स्पर्धा सुरू होऊन सरदारांमध्ये बेदिली माजली हे वृत्त अकबर बादशहास समजले. तेव्हा या गोंधळाचा फायदा घेण्याचे ठरवून अकबर बादशहाने दिल्लीहून अहमदनगरवर फौज पाठविली. त्यावेळी निजामशाहीच्या मुख्य कारभारी रणशूर चाँदबिबीने मोगलांना कडवा प्रतिकार केला व निजामशाहीचे
रक्षण केले. तिच्या मृत्यूनंतर पुन्हा मोगलांनी अहमदनगरला वेढा घातला आणि ते राजधानी शहर इ. स. १६०० ऑगस्ट १९ ला जिंकून घेतले.

राजधानीचे ठिकाण हातातून गेले तरी वजीर मलिक अंबर निराश झाला नाही. त्याने मुर्तजा निजामशहा दुसरा याच्या नावाने परांडा किल्ल्यावरून द्वाही फिरवली व निजामशहीचा कारभार चालू केला. इ. स. १६१० मध्ये मलिक अंबरने खडकी’ (हल्लीचे औरंगाबाद) या ठिकाणी राजधानी स्थापन केली. त्या पुढील वर्षी मलिक अंबरने शहाजी राजांकडे जहागिरीचा स्वतंत्र कारभार सोपविला. इ. स. १६१६ मध्ये मोगल सैन्याने खडकी शहराची लूट केली तेव्हा मलिक अंबरने शरणागती पत्करली व समेट घडवून आणला.

मराठ्यांचा उदय झाला तो मलिक अंबरच्या काळांत. मलिक अंबरने मोगलांशी लढा देण्याची तयारी इ. स. १६१८ मध्ये केली. मोगलांशी झुंज देण्यासाठी गनिमी काव्याने लढणाऱ्या मराठ्यांचे लष्कर उभारण्याची मलिक अंबरास जरुरी वाटली. इ. स. १६१८ ते १६२६ या मलिक अंबरमोगल धुमश्चक्रीत जाधव, काटे, शहाजी भोसले, उदाराम वगेरे मराठे सरदारांना अनुभव मिळून त्यांचा उदय झाला. शहाजीराजे यांचे लग्न लघुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई हिच्याशी इ. स. १६११ च्या सुमारास झाले.’ त्यानंतर त्याचा ज्येष्ठ मुलगा संभाजी याचे लग्न शिवनेरीच्या विश्वासरावाची मुलगी जयंती हिच्याशी झाले. मालोजीच्या मृत्यूनंतर सर्व जहागीर व सैन्य यांचे अधिपत्य शहाजीराजे यांच्याकडे आले. यावेळी खंडागळे हत्ती प्रकरण उपस्थित होऊन ते लघुजी जाधवराव व भोसले घराण्यातील वितुष्टास कारणीभूत झाले. निजामशाहीचा दरबार देवगिरी येथे भरला असता जाधव मंडळी व भोसले मंडळी दरबारांत एकत्र आली ; त्याचबरोबर खंडागळे नावाचे सरदार उपस्थित होते. दरबार संपवून ही सर्व मंडळी आपआपल्या घरी जाण्यासाठी बाहेर पडली असता खंडागळ्याचा एक हत्ती बिथरला आणि त्याने लघुजी जाधवरावांकडील काही माणसे तुडवून जायबंदी केली. तेव्हा लघुजीचा मुलगा दत्ताजी हा हत्तीच्या मालकास शासन करण्यासाठी धावून आला. तो चालून येतो आहे असे पाहून शहाजी व त्यांचे चलत बंध खेलोजी, संभाजी इत्यादी खंडागळ्यांच्या साहाय्यास धावून गेले. त्यामुळे हत्तीचे बिथरणे बाजूस पडून यांच्यामध्येच लढाई सुरू झाली. तीत दत्ताजी संभाजीकडून मारला गेला. लघुजी जाधवास हे समजताच त्याने संभाजी भोसल्यांस गाठून ठार केले. शिवाय पुत्राच्या मृत्युमुळे बेफाम होऊन लघुजीने आपला जावई शहाजी ह्यांच्या दंडावर वार केला. त्यामुळे तो बेशुद्ध होऊन पडला.

निजामशहास ह्या भांडणांची बातमी समजताच त्याने हस्तक्षेप करून हे भांडण तोडले. ह्या प्रकरणातून तत्कालीन मराठा सरदारांची मनोवृत्ती दिसून येते. शुल्लक कारणांवरून हातघाईवर येऊन व एखाद्या बारीक घटनेवरून निर्माण झालेले वैर पिढ्यानपिढ्या चालवण्यात तत्कालीन मराठे भूषण मानीत. ह्या भांडणात निजामशहाने भोसल्यांची बाजू घेतली असा समज लघुजी जाधवरावांचा होऊन त्याने निजामशाही सोडून तो मुघलांस जाऊन मिळाला. (इ. स १६२२-२३) ह्यानंतर शहाजीचे महत्त्व निजामशहाच्या दरबारात वाढले. त्याच्या उमेदवारीची पहिली चार वर्षे (१६२० ते १६२४) निजामशाही वजीर मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली गेली. त्यातल्या शेवटच्या वर्षी भातवडीची लढाई झाली. ही लढाई एका बाजूस मलिक अंबर आणि त्याच्या हाताखाली शहाजी व इतर सरदार आणि दुसऱ्या बाजूस विजापूरकर व मोगल यांचे सरदार यांमध्ये झाली. या लढाईचे मुख्य कारण निजामशाही व आदिलशाही यांमधील बेबनाव आणि मोगलांची दक्षिण देश जिंकण्याची इच्छा, हे होते.

या लढाईस इ. स. १६२४ मध्ये सुरुवात झाली आणि विजापुरी सरदार मुल्ला महमद लारी मारला गेला. हे पाहून विजापुरी फोजा धूम ठोकून पळून गेल्या. आदिलशाहीकडील सुमारे पंचवीस सरदारांचा मलिक अंबरने पराभव केला. काहींचा शिरच्छेद केला. मोगल सरदारांचाही मलिक अंबरने पराभव केला. या लढाईत शहाजी राजांचा भाऊ शरीफजी मारला गेला. तरी शहाजीराजांनी मोठा पराक्रम करून एका मोगल सेनापतीस हार खावयास लावली. ह्या लढाईत शहाजीराजांनी मोठा पराक्रम केल्याचे आदिलशहाच्या लक्षात आले. या लढाईत शहाजीराजांनी गनिमीकाव्याचा अवलंब करणे शक्य आहे. आदिलशहास शहाजी राजांच्या नेत्रदीपक पराक्रमाची भुरळ पडली. शहाने शहाजीराजांस आपल्याकडील दुय्यम श्रेणींचा सेनापती हे पद देण्याचे प्रलोभन दाखविले. शिवाय मलिक अंबर व शहाजी यांचे या लढाईनंतर विशेष सख्य राहिले नव्हते. म्हणून शहाजीराजे निजामशहाची नोकरी सोडून ते आदिलशाहीत सर लष्कर या
पदावर रुजू झाले. ह्या दोन शाह्यांतील युद्धांत त्यांनी आपला पुणे, परगणा व पाटसकडील मुलूख विजापुरी सैन्याच्या मदतीने प्रथम निजामशाहीकडन जिंकून आदिलशाहीकडे घेतला. शहाजी राजांना शिक्षा करण्याचे काम मलिकंबरने हाती घेऊन त्याजवर फौज पाठविली. (शि.व.सा.ले. २२) आणि सालप्याचे घाटांत त्यास कोंडीले. यावेळी त्यास संभाजी मोहिते याचे साहाय्य झाले. म्हणून संभाजीची शिफारस आदिलशाहाकडे करून शहाजीराजे यांनी त्यास तळबीडची देशमुखी देवविली. (१० जानेवारी १६२६) या दरम्यान संभाजी मोहित्यांची बहीण तुकाबाई हिच्याशी शहाजी महाराजांचे लग्न झाले. ती त्यांची दुसरी पत्नी होय.

शहाजीराजांच्या दुर्दैवाने दुसरा इब्राहीम आदिलशहा इ. स. १६२७ च्या सप्टेंबरमध्ये मरण पावला. त्यानंतर त्याचा मुलगा मुहम्मद आदिलशहा गादीवर आला. तो हिंदू सरदारांचा द्वेष करी. त्यामुळे शहाजीराजांना आपल्या कर्तबगारीचे चीज होईल असे वाटेनासे झाले. शिवाय निजामशाहीचा प्रमुख वजीर मलिक अंबर मरून गेला होता. यामुळे शहाजीराजांस आदिलशाही सोडून निजामशाहीत जाणे अधिक फायद्याचे वाटले, म्हणून ते इ. स. १६२८ च्या आरंभी आदिलशाही सोडून निजामशाहीच्या बोलवण्यावरून परत निजमाशाहीत गेले. आणि आपल्या पुणे परगण्याचा मोकासा निजामशहाकडून आपल्या नावे करून घेतला. इ. स. १६२८ मार्चपासून १६२९ च्या नोव्हेंबरपर्यंत साधारणतः १ वर्ष ८ महिने शहाजी राजे फिरून निजामशाहीत राहिले.

जाधवरावांसारखे मातबर सरदार आयत्यावेळी विश्वासघात करतात, त्यांचा बंदोबस्त निजामशहाने करावा असा गुप्त सल्ला जाधवरावांच्या विरुद्ध असलेल्या सरदारांनी निजामशहास दिला. असे होऊ नये म्हणून निजामशहाने त्यांना पकड़न अटकेत ठेवण्याचा विचार केला. जाधव मंडळीस त्याने दौलताबादचे किल्ल्यावर दिनांक २५ ऑगस्ट १६२९ रोजी भेटीस बोलाविले. त्यास पकडीत असता विलक्षण दंगल माजली, तीत खुद्द लखूजी, त्यांचे दोघे पुत्र अवलोजी आणि राघोजी व नातू यशवंतराव इतके पुरुष मारले गेले. लखूजीची बायको गिरजाबाई, भाऊ जगदेवराव व मुलगा बहादूरजी एवढे बचावून सिंदरखेडच्या गढींत आश्रयास गेले. बादशहा शहाजनास हा प्रकार कळल्यावर त्याने ह्या जाधव मंडळीस नोकरीत घेऊन मनसबी ठरवून दिल्या. आपल्या सासन्याचा दग्याने खुन केलेला पाहन निजामशाहीत यापुढे राहणे धोक्याचे आहे तसेच आपल्याला निजामशाहीत परत आणण्याचा जो प्रयत्न झाला त्यांत काहीतरी कुटील कारस्थानाचा भाग असला पाहिजे असा शहाजीराजांचा समज झाला.

आदिलशहाला सोडून आल्याने त्याचा राग व आदिलशहा हा यावेळी निजामशहाचा सहायक या दृष्टीने, शहाजीराजांना साहजिकच मोगलांशी कारस्थान करणे भाग पडले. मोगली सत्ता यावेळी बरीचशी अडचणीत आली होती. मोंगलांचा बालाघाटखालील प्रदेश परत निजामशाहीत आल्याने युद्धाची आघाडी, जी पुष्कळच पढे आणली गेली होती ती बरीच पिछाडीस गेली. लोदीचे बंड ही एक घरांतच आघाडी उघडली गेली होती. जाधवरावांना वीस-पंचवीस हजारांचा जमावही अंतरला होता. शिवाय आदिलशहा व निजामशहा एकजुटीने तोंड देण्यास सिद्ध झाले होते. अशा अडचणीच्या प्रसंगी शहाजीराजांनी मोगली चाकरीत रुजू होण्याची केलेली विनंती बादशहाने त्यांच्या सर्व अटीसह तत्काळ मान्य करून फर्मानही त्वरित पाठविले. त्यामुळे शहाजी राजांकडे दहा हजार सेना आली.

सरंजामार्थ पूर्वी मालोजी राजांकडे असलेले पुणे, सुपे, जुन्नर, संगमनेरादी परगणे दिल्याचे
वचन मोगल बादशहाने शहाजीराजांस दिले. त्यामुळे शहाजीराजांनी आपला वडील मुलगा संभाजी याचे शिवनेरीवर लग्न करून आपण मोगली चाकरीवर नोव्हेंबर १६२९ मध्ये दाखल झाले. एक दोन महिने मोगल सरदार नासिरखानाबरोबर राहून, इब्राहीम लोदी वगैरे बंडखोरांचा पाठलाग करून त्यास उत्तरेकडे हाकलून दिले. त्यानंतर शहाजीराजे आपल्या सरंजामाचा मुलूख निजामशाही सरदारांकडून ताब्यात घेण्यासाठी इ. स. १६३० च्या
जानेवारीच्या सुरुवातीस निघाले. स्वारीस निघण्यापूर्वी शहाजीराजांनी आपली गरोदर पत्नी जिजाबाई हीस आपले व्याही शिवनेरीचे किल्लेदार विश्वासराव यांजकडे ठेविले. शहाजीराजांना निजामशहाने पुणे परगणा जहागीर दिला होता. त्यांना हा मुलुख आपल्या ताब्यात आणणे फारसे
कठीण झाले नाही. स्थानिक लोकांचा ओढा शहाजीराजांकडे होता. या मुलुखाचा बंदोबस्त करून शहाजी राजे पुन्हा पावसाळ्यांत शिवनेरीस गेले. आता हा सर्व भाग त्यांची जहागीर झाली होती.’

ह्यावेळी शहाजहान बादशहाने शहाजी राजांस मोगल सरदार अझमखान याच्या मदतीस जाण्याचा हकूम दिला. यावेळी अझमखान हा बंडखोर मोगल सुभेदार खान जहानच्या पाठीवर होता. शहाजहान बादशहाच्या आज्ञेनुसार अझमखानास खानजहानला कैद करावयाचे होते. बंडखोर
खानजहानच्या मदतीस दुसरा मोगल पठाण सरदार शेरखान धावून गेला. दोघांनी आपला मोर्चा बीडकडे वळविला. आपल्या पाठीवर अझमखान आहे हे समजल्यावर खानजहान व दर्याखान जालना पुरावरून उत्तरेकडे पळाले. त्यांच्या पाठीवर शहाजी राजांसह अझमखान होता. पण अबदुल्लाखान
व सय्यद मुजफर हे बादशहाचे सरदार धावून जात आहेत हे पाहून शहाजीराजे नोव्हेंबर १६३० च्या सुमारास शिवनेरीस परतले. इकडे बादशहाचे सरदारांनी दर्याखानशी सिंरोजजवळ लढाई दिली त्यांत दिनांक ११ जानेवारी १६३० रोजी दर्याखान मारला गेला. खानजहान प्राणावर उदार होऊन लढत असता दिनांक २२ जानेवारी १६३० रोजी तो कालवश झाला.

संदर्भ घटनाक्रम नुसार दिले आहेत

१. बेंद्रे, मालोजी आणि शहाजी महाराज, पृ. १११.
२. बेंद्रे, विजापूरची आदिलशाही (बुसातीन् उस् सलातोन्), पृ. २७०.
३. शिवभारत २/४४ ते ६३.
४. शिवभारत अध्याय ३ श्लोक १.५७, पृ. २२-२९.
५. बेंद्रे, मालोजी आणि शहाजी महाराज, पृ. १८४.२ शि. च. सा. १ ले. २२.
६. बेद्रे, मालोजी आणि शहाजी महाराज, पृ. २४५.
७. कित्ता, पृ. २४६-२४७.
८. अणुपु. अ. ८, श्लोक २०-२३, जेधे शकावली. मां
सरदेसाई, न्यु हिस्टरी पृ. १२४-१२७.
९. बुसातीन उस् सलातीन पृ. १२४-१२७. मनमा निकाय
१०. शिवभारत, अ. ६ श्लोक ९१-९४.
११. बेद्रे, मालोजी आणि शहाजी महाराज, पृ. ३४८.मान
१२. राजवाडे खंड १० ले. २३५ शि. च. सा. खं. ७, ले. २५.
१३. बेंद्रे, मालोजी आणि शहाजी पृ. ३४८.

ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version