स्वराज्य स्थापनेचा प्रारंभ करणारे शहाजीराजे, भाग – २

नमस्कार मित्रांनो, ‘स्वराज्य स्थापनेचा प्रारंभ करणारे शहाजीराजे’ हा मागील लेख आपण वाचला असेल. आपण शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माते म्हणून जाणून आहोत; परंतु धगधगत्या या वादळाची सुर्वात शहाजी राजांनी कर्नाटकात असतानाच करून दिली होती. अफाट शौर्य आणि मुस्तद्दी असलेले शहाजी राजे लोकांना फारसे माहीत नाहीत. शहाजी राजांना मी आदरार्थी नेहमी महाराज साहेब असे बोलत असतो ते का याची प्रचिती या लेखातून आपणास येईल.

शहाजीराजे इ. स. १६३० च्या पावसाळ्यात शिवनेरीस आले. व मुलाचे मुख पाहून बाकीचे विधी पूर्ण केले. यावेळी निजामशाहीत बेदिली माजली होती. मलिक अंबरचा पुत्र फत्तेखान वजीर होऊन निजामशाहीचा कारभार पाहू लागला. फत्तेखानाच्या कारकिर्दीस कंटाळून शहाजी राजे मोगलांकडे आले दौलताबादचा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला तेव्हा मोगलांनी निजामशाही संपुष्टात आणिली आणि निजामशाहीचा वजीर फत्तेखान यास आपला मनसबदार केले व अल्पवयीन सुलतान हुसेन शहा यास ग्वाल्हेरास कैदेत ठेविले. जालना मोगलांच्या सेवेत शहाजीराजांचे मन रमेना, त्यांनी मोगलांची सेवा १ वर्ष केल्यावर, मोगलांना रामराम ठोकून ते १६३१-३२ च्या सुमारास निजामशाहीत दाखल झाले. पुढील १/२ वर्षांत वजीर फत्तेखानाने निजामशाही मोगलांच्या घरात घातली हे पाहून शहाजीराजांना सुचले की आपण निजामशाहीचे पुनरुत्थान करावे. त्याप्रमाणे शहाजीराजांनी आदिलशाहीतील सरदार मुरार जगदेव व रणदुल्लाखान यांची मदत घेऊन मोगलांशी लढण्याची तयारी केली. आदिलशाही सरदारांच्या मदतीने शहाजीराजांनी गनिमी युद्धाच्या
साहाय्याने निजामशहाचा मोगलांनी जिंकलेला मुलूख परत मिळविला.

निजामशाहीच्या गादीवरील अल्पवयीन हसेनशहा मोगलांच्या अटकेत ग्वाल्हेरास होता. त्याच्या ऐवजी निजामशहाच्या वंशातील मूर्तजा (तिसरा) नावाचा एक लहान मुलगा पेमागिरी किल्यावर अटकेत होता त्यास हाताशी धरून त्याची पेमगिरी किल्ल्यावरच निजामशहाच्या गादीवर स्थापना केली. स्वतः शहाजीराजे या निजामाचे वजीर बनले. (इ. स. १६३३) त्यावेळी मोगल सैन्य शहाजी राजांचा पाठलाग करू लागले. तेव्हा शहाजीराजांनी
जिजाबाईस बाळराजांसह पेमगड ऊर्फ भीमगड येथे नेले. तेथेही तेव्हा मोगल सैन्य त्यांच्या पाठलागावर आले म्हणून ते माहुली किल्ल्यावर गेले. तेथेही विजापूर व मोगल सैन्य पाठलाग करण्यासाठी गेली, तेव्हा शहाजीराजांनी अल्पवयी निजामास मोगलांचे हवाली केले व तह केला. नाईलाजाने शहाजीराजे आदिलशाहीच्या नोकरीत १२ हजारांचे मनसबदार म्हणून गेले. या धावपळीच्या काळात बालशिवाजी राजे व मातोश्री जिजाबाई यांचा निवास शिवनेरी, अहमदनगर, पेमगिरी, दौलताबाद व माहुली या निरनिराळ्या ठिकाणी झाला.

शहाजीराजे कर्नाटकात :

इ. स. १६३६ साली शहाजहान बादशहाच्या स्वाधीन पेमगिरी किल्ला शहाजीराजे यांनी केला तेव्हा आदिलशहा व शहाजहान बादशहा यांत तह झाला. त्यात भीमेपलीकडील निजामशहाचा मुलूख मोगलांस द्यावा, अलीकडील आदिलशहास द्यावा ; आदिलशहाने तो शहाजी राजांस जाहगीर द्यावी. बारा हजार स्वारांनिशी महाराजांनी आदिलशहाची चाकरी करावी.’

तहांत सरंजामास जो मुलूख दिला तो भीमानदीच्या दक्षिणेकडील त्यात पुणे समाविष्ट होते. शहाजीराजांनी पुणे हे जहागिरीचे मुख्य ठाणे बनवून
तेथे आपल्या तर्फे दादाजी कोंडदेव मलठणकर यास सुभेदार नेमिले. दादाजीपंतांनी पुणे कसब्याची व गावगन्नाची वसती केली.

त्यानंतर फेब्रुवारी १६३७ मध्ये शहाजीराजे आपली पत्नी जिजाबाई, मुलगा संभाजी व बाल शिवाजीसह विजापुरी गेले. शहाजीराजांनी या सर्वास आपला स्वराज्य संपादनाचा मनोदय सांगितला तो असा, ‘संभाजीराजे यांनी कर्नाटकात स्वराज्य कमवावे आणि शिवरायाने मातोश्रीसह पुण्यास राहून महाराष्ट्रात स्वराज्य स्थापावे.’ तिथे ते २५ फेब्रुवारी रोजी आदिलशहाच्या चाकरीत दाखल झाले. आदिलशहाच्या संमतीने शहाजीराजांनी विजापूर जवळच्या कंपिली गावी आपणांस राहण्यासाठी एक वाडा बांधला. मोठा बगीचा केला व तेथे ते राहू लागले. काही दिवसानी कंपिली गावात बांधलेला वाडा आपणासाठी आदिलशहाने द्यावा अशी खटपट घोरपड्यानी अदिलशहापाशी केली. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांची बदली बंगरुळास केली व कंपीचा वाडा घोरपड्यास राहण्यासाठी दिला. महमद आदिलशहा तरुण, तल्लख व महत्त्वाकांक्षी होता. मोगलांशी गोडी झाल्याने उत्तरेकडून आपल्यावर स्वारी होणार नाही हे आदिलशहाने लक्षात घेतले आणि कर्नाटक जिंकण्याच्या कामगिरीवर शहाजीराजे यांना विजापूर सरदार रणदुल्लाखान याज समवेत नेमले. यावेळी आदिलशहाच्या नजरेसमोर दक्षिणेतील तुंगभद्रा ते रामेश्वरपर्यंतचा हिंदुराजांनी व्यापलेला प्रदेश होता. हा प्रदेश आदिलशहा व कुतूबशहा यांनी जिंकणे त्यांच्या फायद्याचे होते. म्हणून ह्या दोन शाह्यांनी करार करून ठरविले की कर्नाटकचा पूर्व भाग कुतूबशहाने व पश्चिम भाग आदिलशहाने जिंकावा. शहाजी राजे विजापूरच्या चाकरीत हजर झाल्यावर आदिलशहाने रणदुल्ला खानास त्याजबरोबर देऊन कर्नाटकांतील हिंदू राजांस जिंकण्यास पाठविले.

इ. स. १६३७ च्या सुमारास कर्नाटकाची स्थिती :

ह्यावेळी कर्नाटकची स्थिती गोंधळाची होती. विजयनगरचे हिंदू राज्यांचा मुसलमान सत्ताधीशांनी १५६५ मध्ये तालिकोटच्या लढाईत पराभव केला. राज्याची वाताहात केली. त्या राजघराण्यातील एक वंशज वेलोरास राहिला होता व विजयनगरच्या साम्राज्याचे प्रांताधिकारी आपल्या ताब्यातील प्रदेशांवर अंमल चालवीत होते. त्यापैकी इक्केरी, बसवापट्टण, बिदनूर, बंगलोर येथील
पाळेगार विजयनगर राज्यापासून स्वतंत्र झाले होते. मागे सांगितल्याप्रमाणे आदिलशहा व गोवळकोंडेकर यांच्यात कर्नाटकांतील प्रदेश जिंकण्याचा करार झाला होता, त्या करारानुसार आदिलशहास कर्नाटकाचा पश्चिम भाग जिंकावयाचा होता. ह्या पश्चिम भागात जी जी छोटी हिंदु राज्ये होती त्यांनी आपसात एकी न करता एकमेकांचा मलूख जिंकून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न ते करीत होते. आणि स्वार्थाकरिता ते विजापूर आदिलशहाची मदत मागू लागले. अशा रीतीने विजापूरी सरदार रणदुल्लाखान व शहाजीराजे यांना कर्नाटकांत प्रवेश करण्याची संधी मिळाली. दोन विजापुरी सरदारांनी इक्केरी, बसवापट्टण, बिदनूर, बंगलोर ह्या राजांना मांडलिक बनविले. त्यांजकडून खडण्या घेतल्या.

दुसऱ्या स्वारीत विजापुरी सरदार रुस्तमजाने
शहाजीराजांच्या मदतीने बंगरूळ जिंकून घेतले ‘ बंगळूर हातचे गेल्यावर बंगळूरचा राजा केंपगौडा, सावनदुर्ग या किल्ल्यांत रहावयास गेला. रुस्तमजाने बंगळूर व त्याचे भोवतालचा प्रवेश सांभाळण्यासाठी शहाजीराजांस नेमिले. तेव्हा बंगलोर व आसपासचा प्रदेश शहाजीराजांनी आपल्या ताब्यात घेतला (१६३८) इ. स. १६३७ ते १६४० या तीन वर्षांत शहाजीराजांच्या मदतीने विजापूर सुलतानाने कर्नाटकांतील फार मोठा प्रदेश जिंकला. दक्षिणेकडील या स्वाऱ्यांमध्ये कर्नाटक पायाघाट व कर्नाटक बालाघाट असे दोन प्रांत शहाजीराजांच्या पराक्रमाने त्यांना मिळाले होते. ते त्यांच्याकडेच व्यवस्थेसाठी सोपविण्यात आले. त्यापैकी बंगळूरचा अंतर्भाव बालाघाट सुभ्यांत होत असे व तो शहाजीराजांना जहागिरीदाखल देण्यात आला तेव्हापासून हे ठिकाण कर्नाटकांतील शहाजीराजांच्या राज्य सत्तेचे मुख्य केंद्र बनले.

इ. स. १६३९ मध्ये शहाजी राजांना बंगलोरची जहागीर मिळाली. ते शहर त्यांनी आपली राजधानी केली. व स्वतःजवळ बाळगलेल्या १५-२० हजार फौजेची राहण्याची सोय त्या शहरांत केली. त्यासाठी अधिकारी, व्यवस्थापक, कारकून यांचा फौजफाटा तयार केला. त्यांच्या वस्त्या केल्या. महाराष्ट्रांतून जे लोक एकनिष्ठ राहून सेवा करण्यासाठी कर्नाटकांत आले त्यांनाही अन्न, वस्त्र व राहण्यास जागा दिल्या. अशा रीतीने शहाजीराजे यांनी बंगलोरास आपले बस्तान नीट बसविले आणि ते एखाद्या स्वतंत्र राजाप्रमाणे थाटाने राहू लागले.

बंगलोरला शहाजी महाराजांची दिनचर्या खालीलप्रमाणे असे :

बंगलोरला पहाटेस भुपाळ्यांचे मधुर आवाज आणि मंत्रपठण राजांना जागे करीत असे, प्रातर्विधी आटोपल्यावर ते वाड्याच्या समोरील मैदानांत होत
असलेल्या हजार-पाचशे घोडेस्वारांची कवाईत पाहत. नंतर वैद्याकडून नाडी परीक्षा करून घेत. स्नान झाल्यावर सभामंडपांत (दरबारांत) प्रवेश होई. सभामंडपास नवगजी असे संबोधित असत. त्या नवगजीत राजे, संस्थानिक परराष्ट्र वकील व सरदार आधीच येऊन हजर असत. नंतर भालदारांच्या ललकाऱ्यांत महाराज हातातील तलवारीचे अग्न जमिनीला टेकीत सभास्थानात प्रवेश करून सिंहासनारूढ होत.. भोजनोत्तर कधी स्वारी, शिकार तर कधी पंडीत कारभारी यांचे बरोबर राजकारण न्यायमनसुबी, काव्यविनोद इत्यादी व्यवहारांत गुंतलेले असत. सायंकर्म आटोपल्यावर उपहारोत्तर खलबतखान्यांत मोजक्या मुत्सद्यांच्या समवेत गुप्त कारवाई चाले.’

कर्नाटकातील हिंदू संस्थानिकांचे शहाजीराजेंनी इस्लामी सुलतानाप्रमाणे उच्चाटन केले नाही. त्यांच्याकडून खंडणी घेऊन व आपले स्वामित्व मान्य करावयास लावून शहाजीराजे यांनी त्यांचे अस्तित्व कायम ठेविले. हिंदू राजे जाणूनबुजून जिवंत ठेवण्याचे धोरण त्यांनी पत्करले असे राईस म्हणतो ते खरे होय. यावरून शहाजीराजांच्या उदार धोरणाची व स्वकीयांबद्दल त्यांना असलेल्या ममत्वाची प्रचिती येते. शहाजीराजे आदिलशहाचे ताबेदार असले तरीही स्वदेश आणि स्वधर्म याविषयी त्यांच्या मनांत प्रखर अभिमान जागृत होता. शिवाजी राजांच्या वयांच्या १० व्या वर्षी शहाजीराजांनी त्यांना (१६४०) राजमाता जिजाबाईसह बंगलोरास आणविले आणि वडीलपुत्र संभाजी व शिवराय त्यांना दोन वर्षे आपल्या सानिध्यात बंगलोरास ठेविले व प्रशिक्षण दिले. ह्या काळात शिवाजी राजेंना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा व तदनुषंगिक साहाय्य त्यांच्या पिताजीकडून मिळाले होते. जी गोष्ट स्वतः शहाजीराजांस प्रत्यक्ष करणे शक्य झाले नाही ती आपल्या दोनही प्रतापी पुत्राकडून करवून घेण्याची त्यांनी पडद्याआड राहन सिद्धता केली. पुत्राकरता स्वराज्याची योजना आखली आणि त्या स्वराज्य योजनेच्या पूर्ततेसाठी बंगलोरहून शिवाजीराजांबरोबर आपले विश्वासू सरदार मुत्सद्दी पाठविले. शहाजी राजांच्या कर्तृत्वाविषयी प्रा. शेजवलकर म्हणतात, “शिवाजी बंगळुरास त्यांचे सान्निध्यांत असता त्यांच्या संस्कारक्षम मनावर त्यांनी स्वराज्याचा महामंत्र कोरला कारण बंगळूरहून पुण्यास परत येताच शिवाजी राजांनी स्वराज्याची स्थापना करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या.”

शहाजीराजांच्या कर्नाटकांतील कामगिरीचे विश्लेषण शिवचरित्रकार डॉ. बाळकृष्ण यांनी पुढीलप्रमाणे केले आहे. “कर्नाटकाचा सुभेदार म्हणून शहाजीराजे आदिलशहाच्या वतीने कारभार चालवीत होते त्यांच्या पदरी विविध प्रांतातील सूमारे ७५ कवी व पंडित लोक होते. मुस्लिम अधिकाऱ्यांनी तिकडील भागात चालविलेला हिंदू प्रजेची छळ आणि मंदिरांचा विध्वंस त्यांनी थांबविला. हिंदु संस्कृती आणि साहित्य यांचे त्यांनी रक्षण केले. मराठीला दरबारी भाषेचे स्थान दिले. महाराष्ट्रीय मंडळींना आपल्या शासनांत त्यांनी महत्त्वाच्या जागा दिल्या. त्यांनी सुरू केलेली शासन पद्धती पुढील पिढीकडून आणि त्यानंतरही ब्रिटिश आमदानीत अनुसरली गेली. ते संस्कृतचे विद्वान, मत्सद्दी व स्वधर्मनिष्ठ राजे होते. ते बृहन महाराष्ट्राचे संस्थापक होत.” ह्याच आपल्या ग्रंथात डॉ. बाळकृष्ण म्हणतात की, शिवाजीराजांनी मुस्लिम सत्तेविरुद्ध उठाव करून जो विजय मिळविला, त्याचे सर्वश्रेय शहाजीराजांकडे जाते.

राधामाधव विलास चंपू-प्रस्तावनेत इतिहासाचार्य राजवाडे शहाजीराजांचे कर्तृत्व शिवाजी राजांच्या राष्ट्रकार्यात कसे साहाय्यभूत झाले हे सांगत आहेत.
ते लिहितात, ” महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेचे श्रेय शिवाजीस मिळाले हे खरे! पण मूळ कल्पना व योजना शहाजीची होती त्या श्रेयाचा वाटेकरी शहाजीस करणे इतिहासास प्राप्त आहे ! पिंगळे, अत्रे, दादाजी, पानसंबळ, रोझेकर, जेधे, बांदल, हे सर्व मुत्सद्दी सरदार शहाजीचे, जहागीर शहाजीची! तोफा, हत्ती, घोडे व जागजागी गडकोटांतून साठविलेला सरंजाम शहाजीचा ! त्याच्या जोरावर शिवाजीने आपली भव्य इमारत रचली. आकाशातून
पडला आणि धावायला लागला अशातला काही प्रकार शिवाजीचा नव्हता. बापाच्या खांद्यावर उभा राहून शिवाजी प्रथम उच्चासनस्थ झाला. तात्पर्य दरबारी मुत्सद्दी, लष्करी सरदार, लढाऊ सामान, शहाण्णव कुळीच्या जेधे आदी मराठ्यांचे साहाय्य व शहाजींच्या नावाचा दरारा आणि दिमाख या
देणग्या शिवाजीला शहाजीकडून मिळाल्या’ एवंच स्वराज्याचा प्रारंभ शहाजी राजांनी केला.”

संदर्भ घटना क्रमानुसार दिले आहेत.

१. ब. मो. पुरंदरे, राजा शिवछत्रपती (पूर्वार्ध), पृ. १०२.
२. शिवचरित्र निबंधावली, पृ. १००.
३. शिवचरित्र सा. खंड २ ले. ९५-९६, पृ. ११९-१२१.
४. शिवचरित्र प्रदिप, पृ. ७१ ; वर्मा, हिस्टरी ऑफ बिजापूर, पृ. २६६-६९.
५. मालोजी राजे व शहाजी महाराज, पृ. ४७२.
६. एक्याण्णव कलमी बखर, क. २२.
७. बेंद्रे, मालोजी व शहाजी महाराज, पृ. ४८५.
८. परमानंद, शिवभारत, अ. ९ श्लोक ५४-५९.
९. सरदेसाई, मराठी रियासत भाग १, पृ. ९३.
१०. शिवभारत, अध्याय ९, श्लोक ५६-५९.
११. शिवभारत, अ. १०, श्लोक २५-२७.
१२. शेजवलकर, श्री शिवछत्रपति, पृ. ५३.
१३. डॉ. बाळकृष्ण, शिवाजी धी ग्रेट, पृ. १६०-१६२.
१४. शेजवलकर, श्री शिवछत्रपति, पृ. ४४०-४१.

ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा