भीमसेन जोशी यांना लहाणपणापासूनच गायनाचे विलक्षण आकर्षण होते. त्यांची ही आवड लक्षात घेऊन वडिलांनी त्यांच्यासाठी गायन शिक्षकाची नेमणूक केली. मात्र त्यांचे इतक्यात समाधान न झाल्याने ते गाणे शिकण्यासाठी घरातून पळून गेले व मुंबई, विजापूर, जालंधर, कलकत्ता आदी ठिकाणी फिरले.एक उत्कृष्ट शास्त्रीय गायक म्हणून नावारूपाला आले.
भारतरत्न’ पंडित भीमसेन जोशी यांचा आज स्मृतिदीन. धारवाड जिल्ह्यातील रोण येथे १४ फेब्रुवारी १९२२ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गुरुराज व चुलते गोविंदाचार्य हे साहित्यिक होते व त्यांचे आजोबा भीमाचार्य हे त्यांच्या काळातील नाणावलेले गायक होते.
पंडित यांनी काही काळ लखनऊच्या आकाशवाणी केंद्रावर नोकरीही केली. शेवटी त्यांनी सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) यांचेकडे गाण्याची दीक्षा घेतली. ते गुरुसेवा करून अति कष्टाने गानविद्या शिकले. सवाई गंधर्वानीही त्यांना ५ वर्षे चांगली शिकवण दिली.
सवाई गंधर्व हे किराणा घराण्याचे श्रेष्ठ गायक. त्यांनी भास्करबुवा बखले व ग्वाल्हेरचे निसार हुसेन खाँ यांच्या गायकीचे विशेष आत्मसात करून किराणा शैली समृद्ध केली.
भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ पासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.
भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल १९४२ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यांच्या लोकप्रियतेमुळे संगीत मैफिलींसाठी त्यांची धावपळ वाढली. दरम्यान वारंवार होणार्या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने ‘हवाईगंधर्व’ ही पदवी बहाल केली. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरांतील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करत असत.
भीमसेन जोशी यांनी १९४० च्या दशकात लखनौमध्ये एक वर्ष राहून तेथील प्रसिद्ध गायकांकडून ठुमरी शिकून घेतली. भीमसेन जोशींनी ‘संतवाणी’ या नांवाने मराठी अभंग गायनाचे हजारो कार्यक्रम केले.
भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी व कर्नाटकी या २ प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या गोष्टी हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत असत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले. अशा या महान गायकाचे २४ जानेवारी २०११ रोजी पुणे येथे वयाच्या ८८ व्या वर्षी देहावसान झाले.
पंडितजींना खालील अनेक पुरस्कारांनी व सन्मानांनी गौरविण्यात आले.
जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने संगीताचार्य ही पदवी दिली, तर पुण्याच्या टिळक विद्यापीठाने डि. लिट्. ही पदवी दिली. पुण्यभूषण पुरस्कार, स्वरभास्कर पुरस्कार, तानसेन पुरस्कार आदी. पुणे आणि गुलबर्गा येथील विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेटने सन्मानित केले आहे.
●४ नोव्हेंबर २००८ : भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार
● १९८५ : पद्मभूषण पुरस्कार
● १९७६ : संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार
● १९७२ : पद्मश्री पुरस्कार
● १९७१ : संगीत-रत्न