प्रज्ञा शिंदे, न्यूज अनकट प्रतिनिधी
Swargate case to the revelation of Pune's criminal world: ५६ बलात्कार आणि १२५ विनयभंग ही आकडेवारी आहे मागील ४० दिवसांची आणि विशेष धक्का म्हणजे ही आकडेवारी आहे पुण्याची. त्यामुळेच शाहू - फुले-आंबेडकरांचा वैचारिक वारसा, छत्रपती शिवरायांची शिकवण आणि माता जिजाऊनच्या संस्कारांचा पुण्याला विसर पडत चाललाय का? शिक्षणाचे माहेरघर,संस्कृतीच केंद्र आणि सुरक्षेची हमी असणाऱ्या पुण्यात एकावर एक गुन्हे का घडत आहेत? पुण्यातील पोलिस यंत्रणा ढेपळलीय का?
असे अनेक प्रश्न पुण्याच्या अस्मितेला डाग लावत आहेत.पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर जे अत्याचार झाले, त्याने पुण्यात होणाऱ्या गुन्हेगारीला चव्हाट्यावर आणलंय. त्यामुळेच आज आपण आढावा घेऊयात पुण्याच्या गुन्हेगारी जगताचा ….
पुण्यात नेमकं चाललंय काय?
दिल्लीतील निर्भया प्रकरणाची थरारक कहाणी पुण्यात पहाटे ५.३० वाजता घडली. स्वारगेट बसस्थानाकात फलटणला जाणाऱ्या बसची वाट पाहत २६ वर्षांची नर्सिंग होममध्ये कामं करणारी एक तरुणी उभी होती. तेवढ्यात पाठीमागून “ताई कुठे जायचंय?” असा आवाज येतो आणि तो व्यक्ति फलटणची बस पलीकडे लागलीय सांगून तरुणीला ‘शिवशाही’ बसकडे घेवून जातो. आतील अंधार पाहून तिच्या मनात शंका येते; पण तो, “सगळे झोपलेत टॉर्च लावून पहा,” म्हणून मोठ्या चपळाईने तिला बसमध्ये यायला सांगतो. काही वेळानंतर तो व्यक्ति बसच्या खाली उतरतो आणि पाठोपाठ ती तरुणीही, थोड्या वेळात तरुणी समोरच्या एक व्यक्तीला, “यान माझ्याबरोबर चुकीच केल.” अस सांगते तर तो व्यक्ति, “समाज वाईटच आहे आपण जपून रहायच”, असा सल्ला देतो आणि विषण्ण होऊन तरुणी फलटणच्या बसमध्ये बसते. मित्राला फोन करून घटना सांगते तर मित्र हिम्मत देवून पोलिसांना तक्रार करण्याचा सल्ला देतो. परत येवून तरुणी तक्रार करते आणि हा प्रकार उघडकीस येतो.


सध्या या प्रकरणावरील अनेक तर्क-वितर्क समोर येत आहे. मात्र या तर्कांनी पुण्यातील इतर गुन्हे झाकले जाऊ शकत नाही. उलट या प्रकरनाने पुण्याच्या ऐतिहासिक,सांस्कृतिक वारशाच्या पडद्या मागील गुन्हेगारी विश्वाची पोल खोल केलीय आणि पुणे प्रशासनाला खडबडून जागे होण्याची चेतावणी दिलीय.
पुणे पालिसांच्या आकडेवारीनुसार २०२३ पेक्षा २०२४ मध्ये क्राईम रेट कमी झाला आहे. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात बोलताना अमितेश कुमार म्हणाले, “संख्यात्मक दृष्टिकोनातून बघितले तर पुण्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे. पूर्वी प्रत्यके महिन्याला सरासरी ८.५ खून होत होते. आता महिन्याला सरासरी ७.२ खून होतात. आम्हाला हे उद्दिष्ट ६.५ करायचे आहे.” पुढे ते म्हणतात, “पुण्यात खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यामध्ये ३४ टक्के घट झाली आहे.” मात्र ही झाली रेजिस्टर घटनांची गोष्ट; पण अशा आणखी किती केसेस असतील ज्या रेजिस्टरच होत नाहीत, त्यांच्याबद्दल वाच्चता केली जात नाही. अमितेश कुमार म्हणतात गुन्हेगारी कमी झालीय. त्यांच्या म्हणण्यानुसार आज फक्त रेजिस्टर घटनांचीच परिस्थिति पाहू आणि जाणून घेवू पुण्याची खरी अवस्था काय आहे.
मर्डर ९३, हाफ मर्डर १८०, रेप ५०५, विनयभंग किंवा छेडछाड ८६४ ही आहे पुण्यातील आकडेवारी. जे पुणे संस्कृती आणि कलेच्या वारशाने गाजले होते,तेच पुणे आज गुन्हेगारीच्या विळख्यात अडकले आहे. २०२४ मध्ये ८६४ विनयभंगाच्या घटनांबरोबरच ५०५ बलात्काराच्या केसेस घडल्या आहेत. याचा अर्थ,दिवसाला एकापेक्षा जास्त बलात्कार आणि विनय भंगाच्या घटना घडत होत्या आणि हे फक्त इथेच थांबत नाही; अशा अनेक धक्कादायक घटनांनी शहराला हादरवून टाकले आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो, हे पुणेच आहे का? आणि पुण्यात प्रशासन व्यवस्था अस्तित्वात तरी आहे का ?
२०२४ मध्ये गुन्ह्याची आकडेवारी कमी झाली असं म्हटलं गेलं, मात्र २०२४ ची सुरुवातच झाली ती हत्येच्या थरारक घटनेने. ५ जानेवारी २०२४ रोजी,पुण्यातील कुख्यात गुंड ‘शरद मोहोळ’, याला कोथरूडच्या अरुंद गल्लीत गोळ्या घालून ठार मारण्यात आल आणि त्यामुळे पेटलेली बदल्याची आग अगदी जानेवारी २०२५ मध्ये शमवली गेली. तब्बल एक वर्ष गुंडांच्या टोळ्यात अपराधाच्या अनेक घटना घडल्या ज्यांची नोंद नाही.


त्यांनंतर भर दिवसा पुण्यात एका मुलीवर सदाशिव पेठेच्या भर रस्त्यावर एक मुलाने कोयत्याने वार केले. हे ही प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत घडल ‘पोर्षे प्रकरण’, ज्यात अनेक राजकीय मंडळी गोत्यात आली; मात्र एक निबंध लिहून फाइल क्लोज झाली आणि घडणाऱ्या गुन्ह्याची मालिका सुरूच राहिली.यात भर पडली ती बोपदेव घाटातील एका अमानुष घटनेची.


एका रात्री तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात फिरायला गेले होते. रात्री अकराच्या सुमारास तरुणी अणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. तरुणीला धमकावून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि पुन्हा एकदा पोलिस यंत्रणा आणि सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला.
गुन्ह्याची कमी होती की काय त्यात भर पडली ड्रग्सची, ड्रग्स माफिया असलेला ‘ललित पाटील’ एका ड्रग्स प्रकरणात पुणे येथील येरवडा कारागृहात होता; परंतु तो कारागृहात न राहता महिनोमहिने ससून रुग्णालयात मुक्काम ठोकत होता. त्यानंतर रुग्णालयातून हवे तेव्हा तो हॉटेलमध्ये जात होता. त्याची चांगली बडदास्त पोलीस कर्मचारी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ठेवली होती. या सगळ्यांमुळे आता प्रशासन व्यवस्थेबद्दल सामान्य माणसाच्या मनात प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.


बलात्कार जेव्हा मोठ्या मुलींबाबत घडत होते; तेव्हा किमान काही चाणाक्ष बुद्धीच्या लोकांना मुलींच्या कपड्यांवर, त्यांच्या राहणीमानावर, त्यांच्या सवयींवर अंदाधुंद बोट उचलता येत होते; मात्र राजगुरूनगरमध्ये अशी भयानक घटना घडली की, त्यांच्या ही नजरा शरमेने खाली झुकल्या. राजगुरूनगरमध्ये दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी एका ५४ वर्षीय व्यक्तीला अटक केली. या घटनेत ८ आणि ९ वर्षीय दोन बहिणींची लैंगिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आली होती. त्यांचे मृतदेह त्यांच्या घराजवळ पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रममध्ये आढळले. या थरारक घटनेने खरंतर पोलिसांच्या प्रशासनापेक्षा लोकांच्या विकृत मानसिकतेची उघडणी केली.


अशी कित्येक प्रकरण एका मागून एक समोर आली, ज्यामध्ये कोयत्याने प्रियासीचा खून , IT कंपनीतील तरुणीवर कोयत्याने हल्ला, आर्थिक वादातून तरुणीची हत्या, गजा मारणे सारख्या टोळ्यांचे नवनवीन प्रताप,महिला कंडक्टरकडे केलेली शरीर सुखाची मागणी आणि ते प्राप्त करता नाही आले म्हणून तिचा घेतलेला राजीनामा, शिरूरमधील दरोडा आणि रेप आणि खरंतर कहर तर हा झाला की १४ वर्षाच्या मुलीवर जन्मदात्या बापकडूनच लैंगिक अत्याचार केले गेले. अशावेळी आपण आता प्रशासनाला कितीदा दोष द्यायचा असं वाटतं, कारण कुठेतरी लोकांच्या विकृत मानसिकतेचे हे फलित आहे. मात्र या विकृत मानसिकतेला आळा कसा घालायला पाहिजे ही पण तर शेवटी प्रशासनाचीच एक जबाबदारी आहे, हेही नाकारून चालणार नाही.
दुसरीकडे पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री, भाजपचे पाच आमदार, राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार- पुण्याचे पालकमंत्री हे सगळे पुण्यात उपस्थित असताना हे सगळं घडत असेल; तर हे कोण कंट्रोल करू शकेल हा प्रश्न आता पडतोय. ही परिस्थिती पुणे सारख्या शहरात असेल तर गावाकडची छोट्या शहरांची स्थिती काय असेल याचा विचार न केलेलाच बरा.
मंडळी अमितेश कुमार म्हणतात गुन्हेगारी कमी झालीय ; पण खरंच या सगळ्या घटना पाहून तुम्हाला असं वाटतंय का पुण्यातला क्राईम रेट हा कंट्रोल आहे, किंवा कमी झालाय?