गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे महिलांसाठी ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानआरोग्य तपासण्या आणि उपचारांचा महामेळा

महिलांसाठी ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानआरोग्य तपासण्या आणि उपचारांचा महामेळा

देशभरातील महिलांना आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत महिलांसाठी विविध आरोग्य तपासण्या आणि मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जात आहेत, ज्यामुळे त्यांना भविष्यातील आजारांवर वेळीच मात करणे शक्य होणार आहे.

या अभियानामध्ये महिलांसाठी अतिउच्च रक्तदाब, मधुमेह, तसेच स्तन व गर्भाशय मुख कर्करोगांची तपासणी मोफत केली जाईल. याशिवाय, क्षयरोग (TB), अॅनिमिया, आणि सिकलसेल यांसारख्या आजारांचेही निदान केले जाईल. गर्भवती मातांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण आणि योग्य आहाराबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध असेल. मासिक पाळीतील स्वच्छतेविषयी जागृती देखील करण्यात येणार आहे.

या शिबिरांमध्ये फक्त तपासण्याच नाहीत, तर औषधोपचार आणि आरोग्यविषयक प्रश्नांवर तत्काळ उपाययोजना केली जाईल. तज्ज्ञ डॉक्टर प्रत्येक महिलेच्या आरोग्याची सखोल तपासणी करतील आणि त्यानुसार योग्य औषधोपचार देतील. तसेच, ज्येष्ठ महिलांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबतही सविस्तर माहिती दिली जाईल.

अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘आयुष्मान भारत‘ कार्ड काढले जाणार आहे, ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला प्रतिवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचार मिळतील. हे कार्ड दरवर्षी नूतनीकरण केले जाईल.

या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानामुळे महिलांना केवळ आजारांपासून संरक्षण मिळणार नाही, तर त्यांच्यामध्ये आरोग्याबद्दलची जागरूकताही वाढेल. यामुळे एक निरोगी आणि सशक्त समाज घडण्यास मदत होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version