नवी दिल्ली, १६ ऑगस्ट २०२१: बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरने अखेर काल बाजारात पदार्पण केले. कंपनीने स्वातंत्र्य दिनानिमित्त रविवारी आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये अनेक अनोख्या वैशिष्ट्यांचा दावा केला जात आहे.
बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरसंदर्भात लोकांमध्ये सर्वात मोठी शंका वेग आणि पिकअपबद्दल आहे. ओला स्कूटर (ओला एस १) फक्त ३ सेकंदात शून्य ते ४० किमी वेग गाठते. ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल यांनी सांगितले की, ओला भारतात जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादन कारखाना तयार करेल. ही स्कूटर उत्तम डिझाईन आणि उत्तम तंत्रज्ञानाची असल्याचा दावा त्यांनी केला. ही S-1 आणि S-1 Pro या दोन व्हेरीएंटमध्ये येईल.
ते म्हणाले की, जरी ओला स्कूटर घरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी ६ तास लागतील, परंतु ओलाच्या चार्जिंग सेंटरमधील उच्च चार्जिंग पॉईंटपासून ५० टक्के चार्जिंग फक्त १८ मिनिटांत होईल.
किती आहे किंमत?
जर आपण ओला स्कूटर एस -1 प्रो च्या कमाल स्पीड रेंज बद्दल बोललो तर ते ११५ किलोमीटर प्रति तास आहे. ओला स्कूटर एस -1 प्रो एकाच चार्जवर १८१ किलोमीटर पर्यंत धावेल. ओला इलेक्ट्रिक स्कूटर एस -1 ची एक्स-शोरूम किंमत ९९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे आणि एस -1 प्रोची किंमत १,२९,९९९ रुपये असेल.
दिल्लीतील सबसिडीनंतर S -1 केवळ ८५,०९९ रुपयांमध्ये आणि S -1 pro १,१०,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अनुदाना नंतर ती अनुक्रमे ९४,९९९ आणि १,२४,९९९ रुपयांना उपलब्ध होईल.
यात क्रूझ कंट्रोलची सुविधा आहे. स्कूटर चे कम्युनिकेशन तंत्रज्ञान जबरदस्त आहे आणि जेव्हा ती चावीशिवाय मालकाच्या जवळ येते तेव्हा ती सेन्सरद्वारेच चालू होते. यात लाइव्ह लोकेशन ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टम आहे. ही गाडी पूर्णपणे रिमोट कंट्रोल द्वारे वापरली जाऊ शकते. एवढेच नाही तर व्हाईसच्या सहाय्याने त्यावर नियंत्रणही ठेवता येते. ही स्कूटर इन बिल्ट स्पीकर्ससह येते. या स्कूटरची विक्री ८ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि ऑक्टोबरपासून वितरण सुरू होईल.
चार्जिंगसाठी किती वेळ लागेल?
इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात किती यशस्वी होईल, ते किती जलद आणि कसे चार्ज करते यावर अवलंबून आहे. ओलाचे म्हणणे आहे ते आपल्या स्कूटरच्या चार्जिंगसाठी देशभरात चार्जिंग पॉईंट तयार करेल, जे या स्कूटरला वेगाने चार्ज करेल.
दहा रंगांमध्ये उपलब्ध
कंपनीने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, ही स्कूटर एकूण १० रंगांमध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. ओला स्कूटरने त्यांच्या टीझरमध्ये हे उघड केले आहे की अंडर सीट बूट स्पेस क्षमता ५० लिटर असेल, जी एका वेळी दोन हेल्मेट ठेवण्यासाठी योग्य आहे. ओला ने आपली इलेक्ट्रिक स्कूटर ओला स्कूटरची बुकिंग ४९९ रुपयांना सुरु केली आहे. बुकिंग सुरू केल्यानंतर २४ तासांपेक्षा कमी वेळात १ लाख स्कूटरची बुकिंग मिळाली होती. हे पैसे पूर्णपणे परत करण्यायोग्य आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे