स्वीकृतसाठी ”हे”आहे निकष,अन्यथा ठराल अपात्र!

अहमदनगर : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदांसाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे संग्राम शेळके, मदन आढाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा गाडळकर, विपुल शेटिया आणि भारतीय जनता पक्षाकडून रामदास आंधळे हे अपात्र ठरले.
प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही कारवाई केली.
स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज अपात्र केल्यावर आणि त्यासाठी अर्ज दाखल करताना इच्छुकांनी नेमके कोणते कागदपत्र जोडले आहे, याची उत्सुकता नगरकरांना आहे.

संग्राम शेळके यांनी नगरमधील आयटीआयसमोर नंदनवन कॉलनीत कार्यरत असलेल्या साईसेवा संघ या सामाजिक संस्थांवर कार्यरत असल्याचा दाखला जोडला आहे. मदन आढाव यांनी नवनाथ देवस्थान आणि स्वामी सामाजिक प्रतिष्ठानचा दाखला जोडला आहे.

बाबासाहेब गाडलकर आणि माजी नगरसेवक विपुल शेटिया या दोघांनी नागापूर येथील विचारधन चेस अ‍ॅकॅडमी अ‍ॅण्ड स्पोटर्स क्लब संस्थांचा दाखला जोडला आहे.

रामदास आंधळे यांनी केडगाव येथील सावली सार्वजनिक वाचनालयाचा दाखला दिला आहे. या पाचही इच्छुकांनी जोडलेल्या कागदपत्रांमध्ये सामाजिक संस्थांवर पाच वर्षांपासून काम करत असल्याचा दावा केला आहे.

मात्र हे कागदपत्र जोडत असताना या इच्छुकांनी त्यात अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे शासकीय लेखापरीक्षण, संस्थेच्या विश्वस्त मंडळ आदी कागदपत्रांची यात पुर्तता नाही.

निकष:
१. मान्यताप्राप्त वैद्यक व्यावसायिक म्हणून पाच वर्षाचा अनुभव.२. शिक्षण क्षेत्रात किमान पाच वर्ष कामकाजाचा अनुभव.३. सनदी रोखपाल म्हणून पाच वर्षाचा अनुभव आवश्यक.४. पाच वर्षाचा अनुभव असलेली विद्यापीठाचे अभियांत्रिकी पदवीधर व्यक्ती. ५. कायद्याची पदवी धारक किंवा विविध क्षेत्रात पाच वर्षाचा अनुभव आवश्यक. ६. महापालिकेत सहाय्यक आयुक्त किंवा उपायुक्त पदावर पाच वर्षाचा अनुभव गरजेचा. ७. महापालिकेत दोन वर्षे आयुक्त म्हणून केल्याचा अनुभव असणार्‍या व्यक्तीस प्राधान्य. ८. महापालिका क्षेत्रात नोंदणीकृत अशासकीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून किमान पाच वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्तीस प्राधान्य.
याबाबत अ‍ॅड. प्रसन्ना जोशी म्हणाले की, “स्वीकृत अर्जाची छाननी करताना इच्छुकांना अपात्र केल्यामुळे संपूर्ण राज्याला निकषांची माहिती मिळाली आहे. अपात्र झालेल्यांना निकषांनुसार कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, किंवा संबंधित राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना निकषांनुसार असलेल्या व्यक्तींना संधी द्यावी लागेल”.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा