नवी दिल्ली, ११ ऑक्टोंबर २०२२: पुन्हा एकदा स्विस बँकेने भारतीय खातेदारांची यादी जाहीर केलीय. खरं तर, वार्षिक स्वयंचलित (annual automatic information exchange) माहिती देवाणघेवाण अंतर्गत भारताला स्विस बँकेकडून भारतीय खातेदारांची चौथी यादी मिळालीय. यामध्ये ज्या भारतीय नागरिकांची आणि संस्थांची मोठी रक्कम येथे जमा आहे त्यांचा तपशील देण्यात आलाय. करारानुसार, स्वित्झर्लंडने सुमारे ३४ लाख आर्थिक खात्यांचा तपशील १०१ देशांशी शेअर केलाय.
१०१ देशांमधील ३४ लाख खात्यांचा तपशील
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, स्विस बँकेने भारतासोबत शेअर केलेल्या तपशिलांच्या चौथ्या यादीमध्ये शेकडो आर्थिक खात्यांचा पूर्ण समावेश आहे. यामध्ये विशिष्ट व्यक्ती, कॉर्पोरेट आणि ट्रस्टशी संबंधित खाती समाविष्ट आहेत. अहवालानुसार, या एक्सचेंज अंतर्गत सुमारे ३४ लाख खात्यांचे तपशील १०१ देशांसोबत शेअर केले गेलेत. भारतासोबत सामायिक केलेल्या खात्यांबाबत, या खात्यांमध्ये काळा पैसा जमा असल्याचे सांगण्यात आले नसले तरी, खुल्या कर वाचवण्यासाठी आणि इतर आर्थिक गतिविधि करण्यासाठी स्विस बँकेतील ही खाती उघडण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आयकर विभाग लक्ष ठेवणार
स्विस बँकेकडून मिळालेल्या या बँकिंग डेटाचा वापर मनी लाँड्रिंग, टेरर फंडिंग तसेच करचुकवेगिरीच्या इतर प्रकरणांचा तपास करण्यासाठी केला जाऊ शकतो, असं सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हंटलंय. आता या खात्यांवर आयकर विभाग लक्ष ठेवणार आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की भारताला सप्टेंबर २०१९ मध्ये AEOI अंतर्गत स्वित्झर्लंडकडून खात्याच्या तपशीलांचा पहिला संच प्राप्त झाला होता. त्यावेळी ही माहिती मिळवणाऱ्या देशांची संख्या ७५ होती. मागील वर्षाबद्दल बोलायचे तर भारतासह ८६ देशांसोबत तपशील शेअर करण्यात आला.
डेटा एक्सचेंज प्रोग्राममध्ये ५ नवीन देशांचा समावेश
या स्विस बँक खात्यांच्या तपशीलामुळे चुकीच्या पद्धतीने बेहिशेबी संपत्ती मिळवण्यासाठी या खात्यांचा वापर करणाऱ्या लोकांवर कारवाई करणं सोपं होईल. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, फेडरल टॅक्स अॅडमिनिस्ट्रेशन (एफटीए) ने सोमवारी २०१ देशांना स्विस बँकांचे तपशील शेअर केले आणि सांगितले की यावेळी डेटा एक्सचेंज प्रोग्राममध्ये ५ नवीन देशांचा समावेश करण्यात आलाय. यावेळी अल्बानिया, ब्रुनेई दारुसलाम, नायजेरिया, पेरू आणि तुर्की या देशांनाही त्यांच्या देशातील लोकांनी उघडलेल्या खात्यांचा तपशील देण्यात आलाय.
स्विस बँकेत उघडली १ लाख नवीन खाती
खात्यांचा तपशील शेअर करताना, एफटीएनं असेही सांगितले की यावेळी स्विस बँकांमध्ये सुमारे 1 लाख नवीन खाती उघडण्यात आलीत. एफटीएनुसार, भारतीय खात्यांशी संबंधित तपशील देशातील मोठ्या संस्था, व्यावसायिक घराणे आणि व्यक्तींशी संबंधित आहेत. तपशीलांमध्ये, ओळख, खातेदाराचे नाव, पत्ता, निवास तसंच इतर आर्थिक माहिती दिली आहे. स्विस बँक खात्यांच्या तपशीलाशी संबंधित पाचवा संच पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात सामायिक केला जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे