बारामती: सावकारीच्या दोन गुन्ह्यांमुळे जिल्ह्यातील चार तालुक्यातून तडीपार झालेल्या त्या सावकारांविरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार आणखी एक गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. सहा लाखांच्या बदल्यात २१ लाख रुपये वसूल केल्यानंतरही खिशातील रक्कम, दुचाकी बळजबरीने काढून घेण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत महेबुब अब्दुल कुरेशी (रा. म्हाडा काॅलनी, देवळे इस्टेट, बारामती) यांनी फिर्याद दाखल केली आहे. संगीता हनुमंत डुकरे, हनुमंत लिंबाजी डुकरे, व त्यांचे साथीदार, सुरेखा अमोल आवाळे व चंद्रकांत केरबा कसबे (सर्व रा. आमराई, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या आरोपींविरोधात दोनच दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधिक्षकांनी चार तालुक्यातून तडीपारीची कारवाई केली आहे.
कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सन २०१६ ते २३ डिसेंबर २०१९ या कालावधीत ही घटना घडली. आरोपींकडून त्यांनी सहा लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यापोटी या सावकारांनी २१ लाख रुपये जबरदस्तीने, बेकायदेशीरपणे वसूल केले. त्यानंतर जबरदस्तीने फिर्यादीच्या घरात घुसून त्यांचा भाऊ महंमद, आई हसीना यांना दमदाटी केली. त्यांनी १९ लाख रुपये आरोपींकडून घर बांधकामासाठी घेतले होते. ते परत न दिल्यास घराचा ताबा घेणार असे स्टॅम्पवर आरोपींनी लिहून घेतले. तसेच फिर्यादीच्या खिशातील पाकिटातील २१ हजार २०० रुपयांची रक्कम काढून घेतली. खिशातील दौंड अर्बन बॅंकेचा सही केलेला चेक तसेच दुचाकीची चावी जबरीने हिसकावून घेत दारातील दुचाकी (एमएच-४२, एक्स-४७५४) ही हनुमंत डुकरेने नेली. व्याजापोटी आणखी रक्कम द्यावी. या मागणीसाठी वेळोवेळी शिविगाळ, दमदाटी करत मारहाण केली. तू पोलिसात तक्रार दिली तर तुझ्या मुलाबाळांना उचलून घेवून जावू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक अौदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी शेंडगे अधिक तपास करत आहेत.
