लोणी काळभोर, दि. २४ ऑगस्ट २०२०: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरकारभार करणाऱ्या संचालकांवर तातडीने कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिंदेवाडी ता. हवेली येथील माजी उपसरपंच प्रभाकर जगताप यांनी दिला आहे.
पुणे बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांनी फार मोठा गैरव्यवहार केला असूनही त्यांच्यावर आरोप सिद्ध होऊनही अद्याप वसुली झाली नाही. ती तातडीने करावी गरिबांना बँकांमध्ये व्याज, दंडव्याज लावून वसुली केली जाते वेळप्रसंगी अनेकांना यात जीव गमवावे लागले आहेत, असे असताना गैरकारभार करणारे कोणाच्या आशीर्वादाने मोकाट फिरत आहे. त्यांच्याकडून तातडीने वसुली करा अन्यथा कोविडच्या काळातही शेतकरी, व्यापारी आपल्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा लेखी इशारा प्रभाकर जगताप यांनी जिल्हा उपनिंबधक मिलिंद सोबले यांना दिला आहे.
बाजार समितीच्या गैरकारभारविरुद्ध माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, पणन संचालक व पुणे जिल्हाधिकारी यांनाही कारवाई करण्याचे निवेदन देण्यात येणार असल्याचेही प्रभाकर जगताप यांनी दिले
याबाबत जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांना दोनवेळा निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मी तातडीने माहिती घेऊन कारवाई करणार असल्याचे मिलींद सोबले यांनी आश्वासन प्रभाकर जगताप यांना दिले आहे
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे