गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे इंदोरी-वराळे गटात राष्ट्रवादी-भाजपमध्ये अटीतटीचा संघर्ष निश्चित!

इंदोरी-वराळे गटात राष्ट्रवादी-भाजपमध्ये अटीतटीचा संघर्ष निश्चित!

तळेगाव दाभाडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने निर्माण झालेल्या इंदोरी-वराळे गटात राजकीय वातावरण तापले आहे. या गटाच्या विभाजनानंतर वराळे परिसरातील उच्चभ्रू सोसायट्या आणि ग्रामीण मतदारांचा मोठा समावेश झाल्याने या मतदारसंघाचे स्वरूप बदलले आहे.

विशेषतः हा गट सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे अनेक प्रमुख आजी-माजी आणि तगड्या इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी पडले आहे.
आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच अनेक दिग्गजांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र, आरक्षण अपेक्षेविरुद्ध गेल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

आता हे सर्व दावेदार आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरवण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे ‘पतिपत्नी आणि राजकारण‘ असा नवा अंक या गटात पाहायला मिळणार आहे.

मागील निवडणुकांचा इतिहास पाहिला तर, इंदोरी सोमाटणे गटात भाजपने सातत्याने आपले वर्चस्व राखले आहे. १९९२ पासून २०१७ पर्यंतच्या निकालांवरून हे स्पष्ट होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप आपली जागा कायम राखणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महायुती न झाल्यास, या गटात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातच अटीतटीचा सामना रंगणार असल्याचे राजकीय संकेत मिळत आहेत. सध्या या गटात एकूण ३६,२८० मतदार आहेत (वराळे १९,७८१ आणि इंदोरी १६,४९९). एवढ्या मोठ्या मतदारसंख्येमुळे उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींचा कस लागणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपचे नेते बाळा भेगडे यांना आगामी निवडणुका बिनविरोध करण्याची साद घातली आहे. भेगडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी, स्थानिक इच्छुकांचा जोर आणि पक्षांचे वर्चस्व पाहता, प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होणे कठीण दिसत आहे.

सध्या दोन्ही पक्षांचे नेते आणि संभाव्य उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामभेटी आणि कार्यक्रमांचा सपाटा लावत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version