गोल पोस्ट नागरी विकास तळेगाव दाभाडे नगराध्यक्षपद खुल्या वर्गासाठी राजकीय हालचालींना वेग!

तळेगाव दाभाडे नगराध्यक्षपद खुल्या वर्गासाठी राजकीय हालचालींना वेग!

तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमुळे शहरातील राजकीय तापमान शिगेला पोहोचले आहे. यंदा नगराध्यक्षपद खुल्या वर्गासाठी जाहीर झाल्यामुळे निवडणुकीत कमालीची रंगत आली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच इच्छुकांनी आपापल्या प्रभागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले आहे.

अंतिम मतदार यादीवर सर्वांचे लक्ष

प्रारूप मतदार यादीवर तब्बल ३९८० हरकती दाखल झाल्यानंतर त्यांची पुनर्पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे. ३१ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार असल्याने सर्व इच्छुकांचे लक्ष त्याकडे लागले आहे. या यादीनंतरच उमेदवार नेमके कोणत्या प्रभागातून लढणार, याचे चित्र स्पष्ट होईल. सध्या तरी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार खटाटोप सुरू आहे.

संभाव्य युती, नाराजी आणि नवीन चेहरे

राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या संभाव्य युतीची चर्चा एका बाजूला, तर दुसरीकडे पक्षांतर्गत नाराजी आणि उमेदवारीसाठीची रस्सीखेच वाढली आहे.

प्रभागातील आरक्षण बदलाने काही जुन्या कार्यकर्त्यांचे तिकीट धोक्यात आले असून, त्यांनी नवीन प्रभागांची चाचपणी सुरू केली आहे. यामुळे अनेक नवे चेहरे संधीच्या प्रतीक्षेत आहेत, ज्यामुळे तळेगावची राजकीय रंगभूमी अधिकच रोमांचक बनली आहे.

नगराध्यक्षपद खुल्या वर्गासाठी असल्याने ‘आता संधी सर्वांसाठी समान’ असा आत्मविश्वास इच्छुकांमध्ये दिसत आहे. राष्ट्रवादी आणि भाजपने संभाव्य उमेदवारांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मागील निवडणुकीत भाजपने चित्रा जगनाडे यांच्या रूपात जनतेतून नगराध्यक्ष निवडून आणले होते, तसेच १४ नगरसेवकांसह पालिका ताब्यात घेतली होती. यावेळी २८ नगरसेवकांची निवड होणार आहे. शेळके-भेगडे यांनी ‘एकत्र येऊ’ म्हटले असले तरी, दोन्ही बाजूंकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याने महायुतीबाबत साशंकता कायम आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version