डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तालेरा रुग्णालयात नवजात शिशूचा हृदयद्रावक मृत्यू!

महापालिकेच्या तालेरा रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा अक्षम्य वेळकाढूपणा आणि निष्काळजीपणा एका निष्पाप जीवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. प्रसूती वेदनांनी तळमळणाऱ्या एका २३ वर्षीय मातेच्या नवजात शिशूचा पहाटे २.३० ते ३ च्या सुमारास रुग्णालयातच हृदय पिळवटून टाकणारा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नऊ महिने पूर्ण झालेल्या या महिलेच्या सर्व तपासण्या तालेरामध्ये व्यवस्थित झाल्या होत्या. मंगळवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. मात्र, देखरेखीसाठी असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी तिला वारंवार डाव्या कुशीवर झोपण्यास सांगत वेळ मारून नेली. परिस्थितीची गंभीरता ओळखून तातडीने कार्यवाही करण्याऐवजी, मध्यरात्री अडीचच्या सुमारास वेदना असह्य झाल्यावर नातेवाइकांनी आत धाव घेतली तेव्हा देखरेख करणारे डॉक्टर चक्क झोपलेले आढळून आले.

या अक्षम्य दिरंगाईमुळे, बाळ बाहेर येण्यासाठी धडपडत असताना त्याने पोटातच विष्ठा (Mecorium) केली. तालेरा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. संजय सोनेकर यांनी याला दुजोरा दिला आहे की, ती विष्ठा बाळाच्या श्वासनलिकेत गेल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला.

रुग्णालयात तातडीने सोनोग्राफी झाली असती आणि वेळीच प्रसूती केली असती, तर बाळ वाचले असते, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ उपस्थित नव्हते असेही सांगितले जात आहे.

रुग्णालयाच्या या गंभीर निष्काळजीपणामुळे वैद्यकीय विभागाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, डॉक्टरांचा हा ‘कामाचा पहिलाच दिवस’ होता, या उत्तराने प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे