तालिबानचे क्रूर कृत्य, महिला व्हॉलीबॉल खेळाडूचा शिरच्छेद

काबुल, 21 ऑक्टोंबर 2021: अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून खेळाचे भविष्य धोक्यात आले आहे.  आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  तालिबान लढाऊंनी अफगाणिस्तानच्या जूनियर वूमन व्हॉलीबॉल संघाच्या खेळाडूचा शिरच्छेद केला आहे.
 जूनियर वूमन स्टेट संघाच्या प्रशिक्षकाने याबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांना माहिती दिली आहे.  मुलाखतीत असे सांगण्यात आले आहे की मेहजाबीन हकीमी नावाच्या खेळाडूला ऑक्टोबरच्या सुरुवातीला तालिबानने ठार केले.  तालिबानने या कुटुंबाला धमकी दिल्यामुळे कोणीही याबद्दल काहीही बोलले नाही.
अफगाणिस्तानमध्ये अशरफ घनी यांच्या सरकारपूर्वी मेहजबीन काबूलमधील एका स्थानिक क्लबमध्ये सहभागी झाली होती.  ती क्लबची स्टार खेळाडू होती, काही दिवसांपूर्वी तिच्या मृतदेहाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत होते.
 ‘देशात फक्त निवडक खेळाडू शिल्लक’
संघाच्या प्रशिक्षकाच्या मते, तालिबानने ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानवर कब्जा केला तेव्हा संघातील फक्त एक किंवा दोन सदस्यच देश सोडू शकले.  मेहजाबीन बाहेर पडण्यात अपयशी ठरली होती, मात्र यामुळं तिला आपला जीव गमवावा लागलाय.
तालिबानने सत्तेवर आल्यापासून महिलांचे अधिकार दडपले आहेत, अफगाणिस्तानमध्ये सर्व प्रकारच्या खेळांना संकटाचा सामना करावा लागत आहे.  संघाच्या प्रशिक्षकाच्या मते, महिला खेळाडूंची सध्या सर्वात वाईट स्थिती आहे, कारण त्यांना देश सोडावा लागेल, अन्यथा त्यांना लपून राहावे लागेल.
 काही दिवसांपूर्वी फिफा ने अफगाणिस्तानातून अनेक पुरुष आणि महिला खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित बाहेर काढले होते.  या सर्वांना काबूलहून कतारला नेण्यात आले, जेणेकरून ते सुरक्षित असतील.
 सत्तेवर आल्यानंतर तालिबान्यांनी महिलांवर विविध निर्बंध लादण्यास सुरुवात केली.  महाविद्यालयात जाणे, मुलांसोबत अभ्यास करणे, नोकरीला जाणे, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या खेळांमध्ये भाग घेणे यासह अनेक क्षेत्रांमध्ये महिलांवर निर्बंध लादण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा