तालिबानने दानिश सिद्दीकीला जिवंत पकडलं, नंतर ठार केलं, अफगाणिस्तानच्या सैन्यानं केली पुष्टी

नवी दिल्ली, ३ ऑगस्ट २०२१: भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकीची तालिबान्यांनी हत्या केली. यापूर्वी त्याला जिवंत पकडण्यात आलं होतं. त्याची पहिली अधिकृत पुष्टी झाली आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा दलाचे प्रवक्ते अजमल उमर शेनवारी यांनी एका मुलाखतीत याची पुष्टी केली.

शेनवारी म्हणाले, दानिशला तालिबान्यांनी पकडून मारलं. तथापि, त्याच्या शरीरावर क्रूरतेची पुष्टी झालेली नाही. त्याची चौकशी आता सुरू आहे. दानिश ज्या ठिकाणी मारला गेला तो भाग तालिबानच्या ताब्यात आहे, त्यामुळं साक्षीदार शोधण्यात वेळ लागत आहे.

पाकिस्तानची तालिबानला मदत

अजमल उमर शेनवारी यांच्या मते, पाकिस्तान तालिबानला आर्थिक मदत आणि पाठिंबा देत आहे. हे एक प्रॉक्सी वॉर आहे, जे अफगाणिस्तान सरकार लढत आहे. लष्कर, आयएस, अल-कायदा हे सर्व अफगाणिस्तानमध्ये सक्रिय आहेत आणि अनेक दहशतवादी आणि लष्कर लढाऊ पाकिस्तानातून येत आहेत.

शेनवारी यांनी तालिबानच्या विरोधात इतर देशांकडून मदत मागितली. सर्व देश हितधारक आहेत आणि त्यांनी अफगाण सैन्याला पाठिंबा दिला पाहिजे, असंही ते म्हणाले. अफगाणिस्तान बलवान आहे आणि तालिबानला अफगाणिस्तान ताब्यात घेऊ देणार नाही.

निर्घृणपणे हत्या करण्यात आली – अमेरिकन मीडिया

दानिश कंधार शहराच्या स्पिन बोल्डक जिल्ह्यात अफगाण आणि तालिबान युद्धाचं चित्रीकरण करत होते, यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. दानिश यांच्या मृत्यूबाबत, वॉशिंग्टन एक्जामिनरने दावा केला की, जेव्हा पत्रकार जखमी झाले, तेव्हा ते एका मशिदीमध्ये आश्रय घेण्यासाठी गेले. तालिबानी दहशतवाद्यांना याची माहिती मिळताच ते मशिदीत पोहोचले. दानिश हा भारताचा असल्याचं समजताच तालिबान ने त्यांना पकडलं आणि नंतर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा