तालिबान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात कश्मीर मुद्दा उचलून धरणार- तालिबानचे वक्तव्य

काबुल, ४ सप्टेंबर २०२१: तालिबानने अफगाणिस्तान वर ताबा मिळवून तब्बल दोन आठवडे उलटून गेले आहेत. एकंदरीत अफगाणिस्तानमधील स्थिती अजूनही गंभीर आहे. तालिबान कडून अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. तालिबानने भारताला देखील आश्वासन दिले होते की तालिबान भारत विरुद्ध कोणतेही पाऊल उचलणार नाही. असं असतानादेखील तालिबानने भारतासोबत चा व्यापार थांबवला आहे. आता तालिबान कडून आणखीन एक गंभीर वक्तव्य समोर आलंय. तालिबान कश्मीर विषयावर भारताविरोधात बोलणार असल्याचं तालिबानने म्हटलंय.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार तालिबानचा प्रवक्ता सोहेल शहीन याने या भगवत वक्तव्य केलं. अर्थातच आता तालिबान सत्तेत आल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात कश्मीर मुद्दा उचलून धरणार असल्याचे स्पष्ट आहे. सोहेल शहीन याने असे म्हटले आहे की, तालिबान जगातील कुठल्याही मुसलमानाच्या हक्कासाठी आवाज उठवेल, मग तो कश्मीर मधील असला तरीसुद्धा. त्यामुळे भारतासाठी एक वाईट बातमी आहे.
अफगाणिस्तान सार्क ग्रुपचा सदस्य आहे. साउथ एशियन असोसिएशन फॉर रीजनल कॉर्पोरेशन म्हणजेच सार्क गटामध्ये पाकिस्तानचा देखील समावेश आहे. जर भविष्यात सार्क गटाच्या बैठकीत पाकिस्तान बरोबर अफगाणिस्तानने देखील कश्मीर मुद्दा उपस्थित केला तर नक्कीच ही भारताची चिंता वाढवणारी गोष्ट असेल.
चिंतेची बाब ही आहे की, भविष्यात तालिबान पाकिस्तानच्या आतंकवाद्यांच्या सहाय्याने कश्मीर मध्ये आतंकवादी हल्ले घडवून आणू शकतात. दोहा एग्रीमेंट नुसार तालिबानने हे कबूल केले होते की कोणत्याही देशात त्यांच्याकडून आतंकवादी हल्ला घडवून आणला जाणार नाही. परंतु पाकिस्तानच्या सहाय्याने असे हल्ले तालिबान घडवून आणू शकतो. त्यामुळे प्रत्यक्षात तालिबान वर आरोप करता येणार नाही.
रशिया, इराण, चीन, पाकिस्तान यांसारख्या देशांनी तालिबानला अधिकृत सरकार म्हणून मान्य केले आहे. मात्र जगातील अनेक देशांनी याबाबत अजून कोणती भूमिका मांडलेली नाही. भारताने देखील तालिबान सरकारला मान्यता दिली नाही. हेच कारण असू शकते ज्यामुळे तालिबान कडून असं विधान समोर आला. यामुळे तालिबान भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा