नवी दिल्ली, ८ जानेवारी २०२१: ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून आपला विरोध प्रदर्शित केल्यानंतर आज शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये पुन्हा चर्चा होणार आहे. मागच्या चर्चेत शेतकऱ्यांच्या दोन मुद्द्यांवर समाधान निघाले होते. आज शेतकरी आणि सरकार यांच्यात होणाऱ्या चर्चेमध्ये उर्वरित दोन मुद्द्यांचे समाधान काढण्यासाठी चर्चा केली जाईल. आजच्या चर्चेपूर्वी शेतकऱ्यांनी एक भव्य ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून सरकारला आपली ताकद व विरोध दर्शवला.
गुरुवारी शेतकऱ्यांनी कृषी कायद्याचा विरोध करत दिल्लीला लागून असलेल्या सीमांवर ट्रॅक्टर रॅली काढून सरकारला आपल्या शक्तीची जाणीव करून दिली. हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर चालवत ही रॅली काढली होती. शेतकरी नेत्यांनी सरकारला असेदेखील आव्हान केले आहे की, जर त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर येत्या २६ जानेवारीला देखील याहीपेक्षा मोठी भव्य रॅली काढली जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर २०२४ पर्यंत हा विरोध कायम राहील.
आज होणारी चर्चा दुपारी २ वाजता होणार आहे. एम एस पी बाबत हमी देणारा कायदा काढण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकार एम एस पी बाबत चर्चा करण्यासाठी तयार आहे परंतु कायदा मागे घेण्याचा सरकारचा विरोध आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये सुरू असलेला हा विरोध या चर्चेतून संपेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे