पराभवानंतर द्रविडशी बोलणी, मग जय शाहांंना फोन, कोहलीने असं सोडलं कर्णधारपद!

मुंबई, 16 जानेवारी 2022: Virat Kohli Test Captaincy: भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने शनिवारी (15 जानेवारी) संध्याकाळी ट्विट करून अचानक कसोटीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. कोहलीचा हा अचानक निर्णय चाहत्यांना आणि क्रीडा जगतातील लोकांना धक्कादायक ठरलाय. तर प्रत्यक्षात ते काही वेगळंच आहे. कोहलीने या निर्णयाची पूर्ण तयारी केली होती.

वास्तविक, कोहलीने हा निर्णय सर्वप्रथम भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना सांगितला होता. यानंतर त्यानी हा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांना सांगितला. या सर्व प्रकारानंतर कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती जाहीरपणे दिली.

कोहली प्रथम द्रविडला भेटला

सूत्रांवर विश्वास ठेवला तर, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर केपटाऊन कसोटीत शुक्रवारी (14 जानेवारी) टीम इंडियाचा पराभव झाला. सामना संपल्यानंतर कोहली द्रविडला भेटला आणि दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. यादरम्यान दोघांमध्ये कसोटी मालिकेतील पराभवाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोहलीने द्रविडला दिली. याबाबत कोहलीने सहकारी खेळाडूंशी चर्चा केली नाही.

त्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना फोन केला

द्रविडशी बोलल्यानंतर कोहलीने शनिवारी दुपारी बीसीसीआय सचिव जय शाह यांना फोन केला. यादरम्यान कोहलीने जय शाहला आपला निर्णयही सांगितला. फोनवर बोलत असताना जय शाहने कोहलीचा निर्णय मान्य केला. यानंतर संध्याकाळी कोहलीने कर्णधारपद सोडण्याबाबत ट्विट केलं.

कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनीही माहिती दिली

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी सांगितले की, विराट कोहलीने सचिव जय शाह यांना माहिती दिली. त्याच्या निर्णयाचा बोर्ड आदर करतो. जेव्हा त्याने टी-20 चे कर्णधारपद सोडले तेव्हा बोर्डाने वर्ल्ड कपपर्यंत राहण्याचे सांगितले होते, परंतु त्याने आपला निर्णय घेतला होता. अरुण धुमाळ म्हणाले की, कोहली हा भारतीय कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे, त्यामुळं आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा