तळवडेच्या उद्योजकांना पावसाचा ‘तडाखा’: कोट्यवधींच्या करातूनही मूलभूत सुविधांपासून वंचित!

13
Waterlogged roads in Talwade industrial area:
तळवडेच्या उद्योजकांना पावसाचा 'तडाखा

Waterlogged roads in Talwade industrial area: पुणे महानगरपालिकेला कोट्यवधी रुपयांचा कर भरूनही तळवडे, जोतिबानगर, सोनावणे वस्ती आणि चिखली परिसरातील लघुउद्योजक आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले असून, वाहतूक आणि दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. दुचाकी काढताना वाहनचालकांची दमछाक होत असून, मालवाहतूक करणेही जिकिरीचे बनले आहे. यामुळे उद्योजकांना मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

प्रत्येक पावसाळ्यात हाच अनुभव येत असल्याने, उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही सरकारला कोट्यवधी रुपयांचा कर देतो, पण महापालिका मूलभूत सुविधा पुरवण्यात पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे,” असे येथील स्थानिक उद्योजकांचे म्हणणे आहे. रस्त्यावर साचलेले पाणी आणि खड्ड्यांमुळे मालाची वाहतूक करणे कठीण झाले आहे, ज्यामुळे मोठा मनस्ताप होत आहे.

मिळकत कराची वसुली जोरात, पण सुविधांकडे दुर्लक्ष!

तळवडे येथील अनेक उद्योग अंतर्गत रस्त्यालगत आहेत. या रस्त्यांची समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.उद्योजकांकडून नियमितपणे मिळकत कराची वसुली केली जाते, परंतु सुविधा पुरवण्यासाठी मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप लघुउद्योजक राजेंद्र साबदे यांनी केला आहे. दुसरीकडे, कार्यकारी अभियंता विजय वायकर यांनी, “या परिसरातील लघुउद्योग अनधिकृत असल्याने येथे कुठलीच विकासकामे केली जाऊ शकत नाहीत. रस्ते विकसित करणे हा धोरणात्मक विषय असून, वरिष्ठ पातळीवरून निर्णय होतो,” असे स्पष्ट केले आहे.

मात्र, यावर उद्योजक गोरख भोरे यांनी आक्षेप घेतला आहे. “चिखली आणि तळवडे परिसरात हजारो लघुउद्योग असून, या उद्योजकांकडून लाखो रुपयांचा कर प्रशासनाला जमा होतो. या उद्योजकांना किमान मूलभूत सुविधा प्रशासनाने द्यायलाच हव्यात,” अशी त्यांची मागणी आहे.महापालिका प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन तळवडे परिसरातील उद्योजकांना योग्य मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे