तिरुचिरापल्ली, ९ जानेवारी २०२३: तामिळनाडूमध्ये सोने तस्करीप्रकरणी सीमाशुल्क विभागाने कारवाई करताना लाखोंचे सोने जप्त केले आहे. तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाच्या (सीमाशुल्क विभाग) अधिकाऱ्यांनी चॉकलेट पावडरमध्ये मिसळलेले २११ ग्रॅम सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत २१.५५ लाख रुपये आहे.
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानाने दुबईहून आलेल्या एका प्रवाशाला तपासादरम्यान संशयावरून थांबवण्यात आले. हा प्रवासी शनिवारी एअर इंडियाच्या फ्लाइट IX612 ने विमानतळावर पोहोचला आणि तपासणी दरम्यान पकडला गेला. प्रवाशाने चॉकलेट पावडरमध्ये सोन्याची पावडर मिसळून ती चतुराईने चॉकलेट पावडरच्या तीन कंटेनरमध्ये लपवून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, कस्टम विभागाने ते जप्त केले आहे.
कस्टम विभागाने २४ कॅरेट शुद्धतेचे २११ ग्रॅम सोने जप्त केले आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांच्या चेक इन बॅगेजमध्ये १७५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळीही सापडली आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची एकूण किंमत २१.५५ लाख रुपये आहे. या संपूर्ण प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.