मदुराई, २ फेब्रुवारी २०२३ :तामिळनाडूतील मदुराई येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे एका हिंदुत्ववादी नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हिंदू मक्कल काची गटाचे नेते मणिकंदन यांची अज्ञातांनी चाकू भोसकून हत्या केली आहे. ते ४१ वर्षांचे होते. दागिन्यांचे दुकान बंद करून ते घरी जात असताना काही लोकांनी त्यांच्यावर चाकू व कोयत्याने वार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मणिकंदन हे दक्षिण मदुराई येथील स्थानिक हिंदू गटाचे नेते होते. मणिकंदन यांचं एमके पुरम इथे दागिन्यांचे दुकान आहे. दुकान बंद करून ते घरी निघाले असता, त्यांच्यावर हल्ला करून अज्ञातांनी तेथून पळ काढला.
हल्लेखोरांनी आधी हिंदुत्ववादी नेत्यावर कोयत्याने हल्ला केला आणि नंतर दगडफेक केली. त्यानंतर मणिकंदनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून, या हत्येमागील कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.