टाटा मोटर्सला 2022 सालाची सलामी, या कारणामुळे काल शेअरमध्ये जोरदार वाढ

मुंबई, 4 जानेवारी 2022: विक्रीचे उत्कृष्ट आकडे सादर केल्यानंतर सोमवारी टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये जोरदार वाढ झाली. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात, देशातील कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सच्या विक्रीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर मारुती सुझुकी आणि ह्युंदाईच्या विक्रीत घट झाली आहे.

टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत: सोमवारी ट्रेडिंगच्या शेवटी, टाटा मोटर्सचे शेअर्स 3 टक्क्यांनी वाढून 496.80 रुपयांवर बंद झाले. ट्रेडिंगदरम्यान शेअरमध्ये 4 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. टाटा मोटर्सच्या शेअरने इंट्राडेमध्ये 500 रुपयांची पातळी गाठली.

मार्केट कॅपमध्ये वाढ

वर्षाच्या पहिल्या ट्रेडिंग दिवसात वाढ झाल्यामुळे टाटा मोटर्सचे मार्केट कॅप 1.77 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या शेअर्स चा 52 आठवड्यांचा उच्चांक 536 रुपये आहे. या स्टॉकने 6 महिन्यांत 43 टक्के परतावा दिला आहे, तर एका वर्षात 159 टक्के परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी हा share 190 रुपयांच्या आसपास होता.

समभाग वाढण्यामागे टाटा मोटर्सचा वाढता व्यवसाय आहे. टाटा मोटर्सच्या अनेक वाहनांची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर कंपनी इलेक्ट्रिक वाहनांवरही भर देत आहे. डिसेंबरमध्ये, पॅसेंजर व्हेइकल्स सेगमेंटमध्ये (टाटा मोटर्स सेल डेटा), टाटा मोटर्सने ह्युंदाईला मागे टाकून नंबर-2 स्थान पटकावले आहे.

इलेक्ट्रिक कारच्या मागणीत वाढ

टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारची भारतात सर्वाधिक विक्री होत आहे. तसेच कंपनी भविष्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर विशेष लक्ष देत आहे. टाटाने डिसेंबरमध्ये एकूण 35,299 प्रवासी वाहने विकली. ज्यामध्ये 2,255 युनिट्स इलेक्ट्रिक वाहने आहेत. टाटा मोटर्सच्या विक्रीत वार्षिक आधारावर 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Tata Nexon EV इलेक्ट्रिकला भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय टाटा टिगोरची मागणी वाढत आहे. टाटाने डिसेंबर-2021 मध्ये एकूण 2,255 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे, तर नोव्हेंबर-2021 मध्ये 1751 युनिट्सची विक्री झाली आहे. जर आपण वार्षिक आधारावर पाहिले तर विक्रीत 439 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर-2020 मध्ये टाटा इलेक्ट्रिक वाहनांच्या एकूण 418 युनिट्सची विक्री झाली.

टाटा मोटर्ससाठी 2021 हे वर्ष उत्कृष्ट ठरले आहे. कंपनीने म्हटले आहे की 2021 मध्ये एकूण 3,31,178 टाटा कार विकल्या गेल्या आहेत, जे टाटा प्रवासी वाहनांच्या इतिहासात विकल्या गेलेल्या वाहनांची सर्वाधिक संख्या आहे. कंपनीने सांगितले की 2026 पर्यंत पोर्टफोलिओमध्ये 10 इलेक्ट्रिक कार समाविष्ट करण्याची योजना आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा