TCS मध्ये मोठा धक्का! पुण्यात 2500 कर्मचाऱ्यांना सक्तीने राजीनामा?

देशातील सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात होत असल्याने उद्योग क्षेत्रात खळबळ माजली आहे. दोन दशकांनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या कपातीमुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. कंपनीने दोन महिन्यांपूर्वी एकूण कर्मचाऱ्यांपैकी 2% कपात करण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांवर गदा आली. याचा परिणाम आता स्पष्ट दिसू लागला असून, केवळ पुण्यातच जवळपास 2,500 कर्मचाऱ्यांना सक्तीने राजीनामा द्यावा लागल्याचा आरोप नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (NITES) ने केला आहे.

या प्रकरणी NITES अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या कारवाईला औद्योगिक वाद कायदा, 1947 चे उल्लंघन म्हटले असून, विशेषतः 40 वर्षांवरील मध्यम व वरिष्ठ पातळीवरील व्यावसायिक कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचे नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कामगार मंत्रालयाने महाराष्ट्र कामगार सचिवांना आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

दुसरीकडे, TCS ने या आरोपांना फेटाळून लावत सांगितले की ही प्रक्रिया कौशल्य पुनर्गठन उपक्रमाचा भाग असून फक्त एका लहान गटावरच परिणाम झाला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात सक्तीने राजीनामे घेण्याचे दावे कंपनीने नाकारले आहेत. तरीसुद्धा, कर्मचाऱ्यांचा वाढता रोष, सरकारकडून होणारी चौकशी आणि या घडामोडींमुळे IT क्षेत्रात प्रचंड चर्चा रंगली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील