औरंगाबाद, दिनांक १० सप्टेंबर २०२२: राज्यातील शिक्षकांच्या आणि भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्या मधील संघर्ष दिवसेंदिवस चांगलाच वाढत चाललेला पाहायला मिळत आहे. उद्या ११ सप्टेंबरला राज्यातील शिक्षकांनी, आमदार बंब यांच्या विरोधात मोर्चा काढून आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील सर्वच शिक्षक संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्याच्या पावसाळी अधिवेशन काळामध्ये, आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांवरती वेगवेगळे आरोप करून, शिक्षकांचा रोष अंगावर ओढावून घेतला होता. यानंतर संपूर्ण राज्यभर शिक्षकांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून याचा निषेध केला. तर ठिकठिकाणी शाळेवर काळ्या फिती लावून शिक्षक शालेय कामकाजामध्ये सहभागी झाले. यावरती आमदार बंब यांनी पत्रकार परिषदेमधून आपली भूमिका मांडली होती. परंतु अजूनही शिक्षक आणि बंब यांच्यातील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत.
आता शिक्षकांनी जाहीर केलेल्या मोर्चा संदर्भात, आमदार प्रशांत बंब यांना विचारले असता ते म्हणाले हा मोर्चा माझ्या विरोधात नसून, तो संपूर्ण राज्यातील पालक वर्गाच्या आणि जनतेच्या विरोधातील मोर्चा आहे. आता या संघर्षामध्ये पुढे काय होते हे पुढील काही दिवस पहावे लागेल. परंतु या सर्व घडामोडींमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, एवढीच माफक अपेक्षा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर