पुणे ,१९ ऑगस्ट २०२४ – तालुकास्तरावरील शिक्षकांच्या प्रश्नाबाबत तालुकास्तरावरील शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न व अडचणी सोडवण्याबाबत सर्वच शिक्षक संघटनांची बैठक पुणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी(प्राथमिक) संजय नाईकडे यांनी शुक्रवार जिल्हा परिषद पुणे येथे आयोजित केली होती.
यावेळी प्रत्येक तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचा व अडी अडचणी संदर्भात सर्वच शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींकडून तालुका निहाय प्रलंबित कामे व समस्यांचा सविस्तर आढावा नाईकडे यांनी घेतला.प्राथमिक शिक्षकांना विद्यार्थी दैनंदिन अध्यापनाव्यतिरिक्त राज्य शासन व प्रशासनाकडून दररोज वेगवेगळी अशैक्षणिक कामे करण्यास सांगितले जात आहे.मंत्रालयीन पातळीवरील वेगवेगळ्या खात्याचे सचिवांपासून,शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा शिक्षणाधिकारी,तालुका गटशिक्षणाधिकारी,शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या संस्था व डायट मार्फत ऑनलाईन,ऑफलाईन,लिंकद्वारे किंवा एक्सेलशीट द्वारे वेगवेगळ्या माहित्या भरण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांना सुचना दिल्या जातात.भरमसाठ उपक्रमाचा भडीमार या विषयासंदर्भात अशैक्षणिक कामे, ऑनलाइन कामे व अनेक तालुक्यात गटशिक्षणाधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी यांचे वेगवेगळे उपक्रम जास्त होतात.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनाकडे दुर्लक्ष होत असल्याने अशैक्षणिक कामे कमी करण्याची मागणी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी केली. तर सदर मागण्यांबाबत मार्ग काढण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी यावेळी दिले.
न्युज अनकट प्रतिनीधी :अनिल खळदकर