मुंबई, दि. १७ जून २०२०: ‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग’ आणि ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्रातील बालगृहे, बाल निरीक्षण गृहे यांच्याकरिता ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा’ या विषयावरील चर्चासत्र संपन्न झाले.
कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर एक वेगळ्या प्रकारच्या जीवनशैलीस आपण सामोरे जात आहोत. बालगृहांमध्ये मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, तसेच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे असे यावेळी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात बालगृहांमध्ये करावयाची व्यवस्था तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करताना वेगळ्या पद्धतीने प्रमाणित कार्यप्रणालीचा अवलंब करावा लागेल. त्यानुसार विभागाकडून कार्यवाही सुरू असून त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलांनादेखील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शिकविणे ही काळाची गरज आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी बालगृहातील मुलांना स्वच्छतेविषयक सवयी शिकविण्यासह मास्क वापरण्याच्या सवयीसारख्या उपाययोजनांचा वापर करावा अशा सूचना यावेळी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी