Team India Squad Asia Cup, ९ ऑगस्ट २०२२: आशिया कप २०२२ साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची सोमवारी मुंबईत बैठक झाल्यानंतर १५ सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यात आली. विराट कोहली आणि उपकर्णधार केएल राहुलचे भारतीय संघात पुनरागमन झालंय. दुसरीकडं, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळं संघाचा भाग नाही.
आशिया कपसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभपंत (विकेटकीपर), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
हे तिन्ही खेळाडू स्टँडबाय
दुसऱ्या ट्विटमध्ये बीसीसीआयने म्हटलं की, ‘जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळं निवडीसाठी उपलब्ध नव्हते. सध्या ते बंगळुरू येथील एनसीएमध्ये पुनर्वसनात आहेत. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर या तीन खेळाडूंना स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आलंय.
संघात फक्त तीन वेगवान गोलंदाज
विशेष म्हणजे भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंग या तीन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजांना भारतीय संघात स्थान मिळालंय. बिश्नोई, चहल, जडेजा आणि अश्विन हे चार फिरकी गोलंदाज आहेत. कदाचित यूएईची फिरकीची परिस्थिती पाहता भारतीय निवड समितीने हा निर्णय घेतला असंल.
कार्तिक-हुडाही संघात
विराट कोहलीला विंडीज आणि झिम्बाब्वे दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली होती पण आता तो संघात परतलाय. उपकर्णधार केएल राहुल दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतलाय. ऋषभ पंतशिवाय दीपक हुडा आणि दिनेश कार्तिक यांनाही संघात संधी मिळालीय. तसंच खराब फॉर्ममुळे दीपक चहर आणि अक्षर पटेलसह श्रेयस अय्यरला स्टँडबायवर ठेवण्यात आलंय.
२७ ऑगस्टपासून स्पर्धा
२७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत UAE मध्ये होणाऱ्या आशिया कप २०२२ मध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंका, गतविजेते भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान याआधीच स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्याचवेळी पात्रता स्पर्धेनंतर सहावा आणि अंतिम संघ निश्चित केला जाईल. २० ऑगस्टपासून हाँगकाँग, कुवेत, सिंगापूर आणि यूएईसह सहा संघांच्या पात्रता स्पर्धेला सुरुवात होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे