टीम इंडियाचा झाला क्लीन स्वीप, आफ्रिकेने 3-0 ने जिंकली मालिका

Ind Vs Sa, 3rd ODI Match, 24 जानेवारी 2022: इतिहास रचण्याच्या इराद्याने दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेली टीम इंडिया सर्वस्व लुटून परतत आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आणि यासह टीम इंडियाने ही मालिकाही 0-3 ने गमावली. टीम इंडियाने याआधीच कसोटी मालिका 1-2 ने गमावली होती.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या शेवटच्या काही षटकांमध्ये दीपक चहरने जोरदार फलंदाजी केली आणि एका क्षणी टीम इंडिया हा सामना जिंकू शकेल असं वाटत होतं. मात्र दीपक चहर बाद झाला आणि सर्व आशा बंद झाल्या.

दीपक चहर जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडिया अडचणीत आली होती, पण त्याने येताच संपूर्ण चित्र बदलून टाकलं. दीपक चहरने केवळ 34 चेंडूत 54 धावा केल्या, या डावात दीपक चहरने 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

भारताच्या वनडे इतिहासातील ही पाचवी वेळ आहे, जेव्हा टीम इंडियाला वनडे मालिकेत क्लीन स्वीप केलं. या मालिकेपूर्वी 2020 मध्येही भारताने न्यूझीलंडकडून मालिका 0-3 ने गमावली होती.

0-5 वि. वेस्ट इंडिज 1983
0-5 वि वेस्ट इंडीज 1989
0-3 वि श्रीलंका 1997
0-3 वि न्यूझीलंड 2020
0-3 वि दक्षिण आफ्रिका 2022

टीम इंडियाच्या फलंदाजीत नव्हता दम

तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेने भारताला 288 धावांचे लक्ष्य दिलं होतं. पण कर्णधार केएल राहुल (9 धावा) पुन्हा एकदा येथे अपयशी ठरला आणि लवकरच निघून गेला. विराट कोहली (65 धावा), शिखर धवन (61 धावा) यांच्यात नक्कीच भागीदारी होती पण धवन आऊट होताच संपूर्ण टीम इंडिया कोसळली.

ऋषभ पंत (0 धावा) पुन्हा एकदा त्याच्याच निष्काळजीपणाचा बळी ठरला, त्याच्यापाठोपाठ श्रेयस अय्यर (26 धावा), सूर्यकुमार यादव (39 धावा) यांनाही संधीचं मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही.

बॉलिंग युनिट बदलणं योग्य ठरलं, पण धावाही गेल्या

तिसर्‍या सामन्यात टीम इंडियाने बॉलिंग युनिटमध्ये बदल केला. या सामन्यात रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमार यांना वगळण्यात आलं. त्याच्या जागी आलेल्या गोलंदाजांमुळे या मालिकेत प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑलआऊट झाला. मात्र, दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने शानदार खेळी करत 124 धावा केल्या. डी कॉकचं हे भारताविरुद्धचे सहावे शतक होतं.

भारताकडून दीपक चहर, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रसिद्ध कृष्णाने तीन विकेट्स घेतल्या, तर फिरकीपटू युझवेंद्र चहलला एक विकेट मिळाली, पण जयंत यादव काही चमत्कार करू शकला नाही. तथापि, कोणताही गोलंदाज धावा रोखू शकला नाही आणि प्रत्येकाने सुमारे 6 च्या सरासरीने धावा स्वीकारल्या.

विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडिया येथे कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकून इतिहास रचेल असं वाटत होतं, मात्र तसं होऊ शकलं नाही. प्रथम टीम इंडियाने कसोटी मालिका 1-2 ने गमावली आणि आता आफ्रिकेनं क्लीन स्वीप केला आहे.

या दौऱ्यावर कर्णधार रोहित शर्माची अनुपस्थिती टीम इंडियासाठी जड ठरली. केएल राहुल कर्णधारपदाचा दबाव सहन करू शकला नाही आणि त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवरही दिसून आला. यासोबतच मैदानावरील स्थलांतर, गोलंदाजीतील बदल यातही उणिवा होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा