वेस्ट इंडिजनंतर टीम इंडिया जाणार झिम्बाब्वे दौऱ्यावर, वेळापत्रक जाहीर!

मुंबई, 9 जुलै 2022: टीम इंडिया पुढील महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही मंडळांनी सहमती दर्शवली आहे परंतु अद्याप या दौऱ्याला अधिकृत मान्यता मिळालेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार हे सामने 18, 20 आणि 22 ऑगस्टला खेळवले जाऊ शकतात. बीसीसीआय या दौऱ्यासाठी दुय्यम दर्जाचा संघ पाठवू शकते, ज्यात काही वरिष्ठ खेळाडूही असू शकतात.

झिम्बाब्वेचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत म्हणाले, “भारताविरुद्धची मालिका ही झिम्बाब्वेमधील क्रिकेट समुदायासाठी मोठी संधी आहे. या मालिकेमुळे तरुण पिढीमध्ये हा खेळ खेळण्यासाठी खूप उत्सुकता निर्माण होईल. एकंदरीत ही मालिका झिम्बाब्वे क्रिकेटसाठी चांगलीच असेल.

सहा वर्षांनंतर होत आहे हा दौरा

सर्व काही सुरळीत राहिल्यास भारतीय संघ सहा वर्षांनंतर झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. गेल्या वेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया जून-जुलै 2016 मध्ये झिम्बाब्वेला तीन एकदिवसीय आणि तितक्याच टी-20 सामन्यांसाठी गेली होती. या दौऱ्यात टी-20 सामन्यांची मालिका आयोजित केली जाणार नसून फक्त एकदिवसीय मालिका खेळवली जाईल.

भारताचा झिम्बाब्वे दौरा (अपेक्षित)

पहिली वनडे – 18 ऑगस्ट
दुसरी वनडे – 20 ऑगस्ट
तिसरी वनडे – 22 ऑगस्ट

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात व्यस्त

भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे आणि टी-20 मालिकेत व्यस्त आहे. भारताचा इंग्लंड दौरा 17 जुलै रोजी शेवटच्या वनडे सामन्याने संपेल. इंग्लंडनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे त्यांना तीन वनडे आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहेत. विशेष म्हणजे टी-20 मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. वेस्ट इंडिजचा हा दौरा 22 जुलैपासून सुरू होणार असून शेवटचा सामना 7 ऑगस्टला होणार आहे.

टीम इंडिया आशिया कपमध्ये सहभागी होणार

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार असून, त्यानंतर भारतीय संघ आशिया कपमध्ये सहभागी होणार आहे. 28 ऑगस्टला आशिया चषकात भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. यावेळी आशिया कपचे यजमानपद श्रीलंकेकडे आहे. मात्र, आशिया चषकाच्या यजमानपदाची संपूर्ण परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा