डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या चंद्रहार पाटील यांची तहसीलदारांना मारहाण

सांगली, दि. ४ मे २०२० : आमच्या वाळूच्या डंपरवर दंड का केला? या कारणावरुन खानापूरचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना दोन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या चंद्रहार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली आहे. ही घटना रविवारी (दि.३) रोजी सांगली जिल्ह्यातील विटा येथे घडली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार ऋषिकश शेळके म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी विटा येथील तहसिल कार्यालयातील काम उरकून बाहेर पडत पडत होतो. त्यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व त्यांचे सहकारी कार्यालयाजवळ येवून मला जाब विचारू लागले की, आमच्यावर वाळूचा इतका दंड का केला? त्यानंतर मी त्यांना कायदेशिर अपिल करण्याचा सल्ला दिला.

“सदर दंड मी स्वत: कमी करु शकत नाही, असे त्यांना सांगून मी गाडीमध्ये बसत असताना मला बाहेर ओढून मारहाण करण्यात आली. त्यानंतर ते सर्व घटनास्थळावरून पळून गेले.”

याप्रकरणी तहसिलदार ऋषिकेश शेळके यांनी चंद्रहार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांवर विटा पोलिसात तक्रार दिली आहे. विटा पोलिसात चंद्रहार पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली होती. त्यामध्ये चंद्रहार पाटील यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे ही मारहाण करण्यात आल्याचे शेळके यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा