न्यूज अनकट प्रतिनिधी,भागा वरखाडे
प्रेमाचा त्रिकोण असेल, तर त्याचा चौकोन व्हायला वेळ लागत नाही. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव यांचे प्रेमप्रकरण असेच गाजत आहेत. या प्रेमप्रकरणाचा फटका लालू प्रसाद यांच्या दुसऱ्या चिरंजीवांना बसण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन लालूप्रसाद यांनी तेज प्रताप यांची पक्षातून आणि कुटुंबातून हकालपट्टी केली असली, तरी त्यावर आता चर्चा होणे स्वाभावीक आहे.
कधी स्वतःला कृष्ण, कधी शिव तर कधी भाऊ अर्जुन म्हणवणाऱ्या तेज प्रताप यादव यांचा त्रास कमी होताना दिसत नाहीत. अलिकडच्या काळात एका छायाचित्रामुळे चर्चेत आलेले तेज प्रताप आता बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या राजकीय चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत आहेत. प्रथम महुआ, नंतर हसनपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले तेज प्रताप राष्ट्रीय जनता दलामधून बाहेर पडल्यानंतर स्वतःसाठी नवीन राजकीय अस्तित्व शोधण्यात व्यस्त आहेत. तेज प्रताप आगामी निवडणुका अपक्ष उमेदवार म्हणून लढवू शकतात किंवा स्वतःचा पक्ष स्थापन करू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. राष्ट्रीय जनता दलामधून बाहेर पडलेल्या आमदार तेज प्रताप यादव यांच्या प्रेमप्रकरणाचे सत्य समोर आल्यानंतर बिहारच्या राजकारणात एक नवीन खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे लालू-राबडी कुटुंब आणि राजद अस्वस्थ होणार नाही, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमधील विरोधकांच्या राजकारणावरही त्याचा तात्काळ परिणाम होईल. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांना निवडणुकीत उतरावे लागणार आहे. ते तेजप्रताप यांचे धाकटे भाऊ आहेत. तेज प्रताप हे त्यांच्या कुटुंबातील वादाचे केंद्र आहेत. त्यांच्यामुळे महागंठन आघाडीच्या अडचणीदेखील वाढू शकतात. लालू यादव यांनी तेज प्रताप यांना राष्ट्रीय जनता दलातून आणि कुटुंबातून काढून टाकून त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली आहे; परंतु भूतकाळातील घटनांवरून असे दिसून येते, की हळूहळू त्यांचे त्यांच्या मुलावरील प्रेम परत येईल. त्यामुळे तेजस्वी यादव तसेच महागंठन अडचणीत येऊ शकते. तेज प्रताप यांच्या इतिहासावरून असे दिसून येते, की ते जास्त काळ शांत बसणार नाहीत. ते निश्चितपणे असे काही करतील, की त्यामुळे महागंठन आघाडीचे तसेच लालू कुटुंबाचे राजकारण अस्वस्थ राहील.
तेजप्रताप यांच्यावरील कारवाईने लालू कुटुंबातील गोंधळ संपणार नाही, तर ही सुरुवात आहे. तेज प्रताप यांच्या ताज्या कृतीशी तीन कुटुंबांचा थेट संबंध आहे. तेज प्रताप यांच्या पत्नी ऐश्वर्या राय यांनीही या दिशेने संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे लालू कुटुंबाने केवळ दिखाव्यासाठी कारवाई केली आहे, असा राय हिच्या कुटुंबाचा आरोप आहे. सर्वजण एकत्रच आहेत. काही दिवसांनी गोंधळ शांत होताच पुन्हा एकत्र येतील, असे हे कुटुंब म्हणते. तेज प्रताप यांच्या ताज्या कृतीशी तीन कुटुंबांचा थेट संबंध आहे. अनुष्का यादव हिच्यासोबत त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. ती अद्याप समोर आलेली नाही. घटस्फोटासाठी आठ वर्षांपासून न्यायालयात चकरा मारत असलेले ऐश्वर्या राय यांचे कुटुंबही उघडपणे अनुष्काला पुढे येण्याची वाट पाहत आहे. ऐश्वर्या ही माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात आहे. या प्रकरणात आणखी एका महिला पात्राचे नावही चर्चेत आले आहे. काही दिवसांत तिचे वक्तव्यही समोर येईल.
तेज प्रताप यांच्या प्रतापामुळे लालू कुटुंबावर सर्व बाजूंनी हल्ले होतील. त्यामुळे हे प्रकरण कौटुंबिक प्रकरण असूनही राजकीय वळण घेऊ शकते. निवडणुकीच्या वातावरणात, सत्ताधारी भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या प्रवक्त्यांना विरोधी पक्षांवर हल्ला करण्याची यापेक्षा चांगली संधी मिळू शकत नाही. तेजस्वी यादव यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाचे मित्रपक्ष काँग्रेस आणि डाव्या पक्षांनाही त्यामुळे बॅकफूटवर जावे लागू शकते; परंतु तेज प्रताप यांच्यावरील कारवाईने विरोधकांचे हत्यार बोथट करण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकांनी तेज प्रताप यांच्या हकालपट्टीला राजकीय नाटक म्हटले आहे. हसनपूर विधानसभा आमदार तेज प्रताप यादव पुन्हा एकदा ‘सोशल मीडिया’वर व्हायरल व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या कथित दुहेरी लग्नाच्या प्रकरणाची राज्यभर बरीच चर्चा आहे.
तेज प्रताप यांच्या मतदारसंघात त्यांचा फारसा संपर्क नसल्याच्या तक्रारी आहेत. लोकांना त्यांच्या बाबत फारशी माहिती नाही, असे दिसते. अगोदर एका मुलीशी लग्न करून तिचे स्वप्न उद्ध्वस्त केले, तर आता अगोदर विवाहित असताना दुसऱ्या मुलीचेही आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केले. राजकीय पक्षही या मुद्द्यावर राष्ट्रीय जनता दलावर सतत हल्ला करत आहेत. तथापि, पक्षाने तेज प्रतापला स्वतःपासून वेगळे करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे; परंतु कुटुंब आणि राजकारण या दोन्हींपासून दूर गेल्यानंतर तेज प्रताप यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यांनी त्यांच्यावरील आरोपांना उत्तर दिले, तरी अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कुटुंब आणि पक्षापासून दूर राहिल्यानंतर सतत राजकीय बाणांचा सामना करणारे तेज प्रताप आता नवीन मार्ग शोधत आहेत. तथापि, काही लोकांचा असा दावा आहे, की या प्रकरणाबाबत हा एक नवीन मार्ग असू शकतो. लालू प्रसाद यांनी तेज प्रताप यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे.
आता त्यांना राष्ट्रीय जनता दलातून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत ते अपक्ष म्हणून किंवा नवीन पक्षाच्या बॅनरखाली निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. यापूर्वीही तेज प्रताप यांनी अशा अनेक गोष्टी केल्या. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाच्या अडचणी वाढल्या. स्वतःच्या मर्जीने काम करणारा तेज प्रताप आता अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. तेज प्रताप यांनी २०१७ मध्ये धर्मनिरपेक्ष सेवक संघाची स्थापना केली. त्यांनी या संघटनेला सर्व संघटनांपेक्षा पुढे नेण्याचा मानसही व्यक्त केला होता. आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुढे जाणारे तेज प्रताप आता बदलती समीकरणे पाहता नवीन राजकीय मैदान शोधत आहेत.लग्न आणि त्यानंतरची प्रेमप्रकरणे भारतीय राजकारणात नवीन नाहीत. तेज प्रताप यांच्या प्रकरणाशी साधर्म्य असलेली अनेक प्रकरणे पदोपदी आढळतात. त्यापैकी एक प्रकरण तर गांधी कुटुंबाशी संबंधित आहे. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधींनी मनेका गांधींना घरातून हाकलून लावले, अशा चर्चा राजकीय वर्तुळात खूप झाल्या; परंतु त्यापेक्षा अधिक गांभीर्याने चर्चा होण्यासारखे प्रकरण संजय गांधी आणि रुखसाना सुलतान यांचे होते.
आणीबाणीच्या काळात त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या यादीत जगदीश टायटलर, कमलनाथ, सज्जन कुमार अशी नावे होती. त्यापैकी एक रुखसाना सुलतानदेखील होती. ती संजय गांधींच्या चौकडीतील एकमेव महिला सदस्य होती. आणीबाणीच्या काळात नसबंदी करण्याची जबाबदारी संजय यांनी रुखसानावर सोपवली होती. रुखसाना सुलतानचा प्रभाव इतका मजबूत होता, की काँग्रेसचे मोठे नेते तिच्यापुढे नतमस्तक होत. संजय गांधींशी असलेले तिचे जवळचे नाते अनेकदा मनेका आणि इंदिरा गांधी यांच्यातील वादाचे कारण बनले होते. बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग ही या रुखसान सुलतानाची मुलगी आहे. काँग्रेस नेते नारायण दत्त तिवारी यांचे उज्ज्वला शर्माशी असलेले नाते २००८ मध्ये रोहित शेखर नावाच्या एका तरुणाने पुढे येऊन सांगितले. सुरुवातीला तिवारी त्यांच्या नात्याला नकार देत राहिले; परंतु डीएनए चाचणीनंतर रोहित शेखर हा नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा असल्याचे सिद्ध झाले. हे प्रकरण न्यायालयात गेले आणि शेवटी नारायण दत्त तिवारी यांनी रोहितला मुलगा म्हणून स्वीकारले.
समता पक्षाचे संस्थापक आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे लग्न लैला कबीरशी झाले होते. नंतर, ते वेगळे झाले आणि जया जेटली यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या आयुष्यात प्रवेश केला.जेटली यांचे पती फर्नांडिस यांच्या विभागात काम करत होते. जॉर्ज यांचे जेटली यांच्याशी असलेले नाते खूप चर्चेत होते; परंतु असे असूनही त्या जॉर्जला सोडून गेल्या नाहीत. त्या आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिल्या आणि जॉर्ज खूप आजारी असतानाही त्यांची सेवा करत राहिल्या. लैला कबीर यांनी जया जेटली आणि जॉर्ज यांच्यातील नात्याला आक्षेप घेतला. कारण त्यांचा घटस्फोट झाला नव्हता. काँग्रेस नेते शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर यांच्या लग्नाचीही राजकीय वर्तुळात खूप चर्चा झाली. कारण या दोघांचे हे तिसरे लग्न होते. थरूर यांचे पहिले लग्न तिलोत्तमा मुखर्जीशी झाले होते. नंतर त्यांनी परदेशी महिला क्रिस्टा जाइल्सशी लग्न केले. ही दोन्ही लग्ने घटस्फोटात संपली आणि २०१० मध्ये थरूर यांनी सुनंदा पुष्करशी तिसरे लग्न केले; परंतु २०१४ मध्ये त्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. थरूर आणि पुष्कर यांच्या लग्नाची देशात खूप चर्चा झाली.














































