नवी दिल्ली, दि. २८ मे २०२०: भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) सुलूर या हवाई स्थानकावर ‘तेजस एमके-१’ चा भारताच्या लढावू विमानांच्या ताफ्यामध्ये बुधवारी समावेश करण्यात आला. सुलूर या हवाई स्थानकामधल्या ‘फ्लाईंग बुलेट’या नावाने ओळखल्या जाणा-या नंबर १८ स्क्वाड्रनचे अलिकडेच पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. तेजसच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाने परिचालन क्षमता वृद्धीच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. अशा पद्धतीच्या लढावू विमानांचा समावेश आपल्या ताफ्यामध्ये करणारे भारतीय हवाई दलाचे हे पहिले स्क्वाड्रन आहे. तेजस एमके-१ मुळे देशाच्या स्वदेशी लढावू विमान बांधणी कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. तसेच ‘मेक इन इंडिया’ उपक्रमालाही प्रोत्साहन मिळणार आहे. ‘तेजस एमके-१ एफओसी’मध्ये एकल इंजिन आहे. तसेच ते वजनाला अतिशय हलके-कमी, अतिशय चपळाईने कार्यरत राहू शकते. तसेच सर्वप्रकारच्या हवामानामध्ये बहुविध भूमिका पार पाडणारे हे लढावू विमान आहे. तेजसमध्ये हवेतल्या हवेमध्येच इंधन भरण्याची सुविधा-क्षमता आहे. त्यामुळे तेजस खरोखरीच अष्टपैलू कामगिरी करणारे लढावू विमान आहे.
या स्क्वाड्रनचे संचालन हवाई दल प्रमुख (सीएएस) एअर चिफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी केले. यावेळी सदर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग, एअर मार्शल अमित तिवारी आणि १८ स्क्वाड्रनचे कमोडोर कमांडंट एअर मार्शल टीडी जोसेफ, एचएएलचे मुख्य कार्यकारी संचालक आर माधवन आणि पीजीडी (सीए) आणि एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे संचालक डॉ. गिरीश देवधर उपस्थित होते. हवाई दल प्रमुखांनी दलाच्या सुलूर स्थानकावरील कर्मचा-यांना मार्गदर्शन केले आणि त्यांनी सदर्न हवाई कमांड तसेच सुलूर हवाई स्थानकाच्या कर्मचारी वर्गाने केलेल्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले. या ऐतिहासिक कामगिरीसाठी एचएएल, एडीए, डीआरडीओ प्रयोगशाळा, डीपीएसयू, एमएसएमई आणि एलसीए यांच्यासह इतर सर्व सहभागितांचे कौतुक केले.
या कार्यक्रमामध्ये तेजस एफओसी आवृत्तीच्या विमानांचे दस्तऐवज एचएएलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी हवाई दलाच्या प्रमुखांना सादर केले. त्यानंतर हवाई दलाच्या १८ स्क्वाड्रन ग्रुपचे कॅप्टन मनीष तोलानी यांच्याकडे ही कागदपत्रे विमानाच्या किल्ल्यांसमवेत सुपूर्द करण्याचा समारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी विमानांचे संचलन झाले. त्यामध्ये एमआय १७ व्ही ५ आणि एएलएच, एएन-३२ परिवहन विमान आणि तेजस एमके-१ हे लढावू विमानही सहभागी झाले होते.
अंबाला येथे दि. १५ एप्रिल, १९६५ रोजी फोलँड जीनॅट एअरक्राफ्टबरोबर नंबर १८ स्क्वाड्रनची स्थापना करण्यात आली होती. पहिल्या भारत- पाकिस्तान युद्धाच्या काळात भारतीय हवाई दलामधले परमवीर चक्र प्राप्त करणारे एकमेव फ्लाईंग ऑफिसर निर्मल जीतसिंग सेखोन हे या पथकामध्ये होते. या स्क्वाड्रनला एचएएलने निर्माण केलेले दोन एअरक्राफ्ट, तेजस आणि अजीत यांचे संचालन करण्याची विशेष गौरवपूर्ण कामगिरी करता आली. तसेच बरीच वर्षे देशभरातल्या विविध हवाई तळांवरून मिग-२७ एमएल या विमानांचे संचालनही त्यांनी केले. या स्क्वाड्रनला एप्रिल २०१६ मध्ये ‘नंबर प्लेटेड’ करण्यात आले होते. या स्क्वाड्रनवरून सदर्न एअर कमांडच्या ऑपरेशन कंट्रोलचे काम करण्यात येते. त्याची संपूर्ण एकीकृत जबाबदारी या स्क्वाड्रनला स्वीकारावी लागते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी हवाई दल प्रमुख, एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया, पीव्हीएसएम एव्हीएसएम व्हीएम एडीसी यांनी ४५ स्क्वाड्रनबरोबर तेजस एमके-१ या लढावू विमानाने उड्डाण केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी