तेजस्वी चेहेऱ्याचे विलक्षण व्यक्तिमत्व “स्वामी विवेकानंद”

स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. मूळचे बंगाली असलेले स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी उत्तर कोलकत्ता येथेही सिमलपल्ली येथे झाला. हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे आजचा विवेकानंदांचा जन्मदिवस हा “युवक दिन” म्हणून साजरा केला जातो.

विवेकानंद यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले.
किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते. सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद हे मित्र परिवारात प्रिय होते. त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरू नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन , व्यायाम , कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन या गोष्टींची प्रचंड आवड होती.

नरेंद्रनाथांनी घरीच आपल्या शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये बीए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

नरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कान्ट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या ‘एज्युकेशन’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते.
१८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले. त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे की, “नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही.” त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. “एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.त्यांची कल्पना शक्ती अतिशय विलक्षण अशी होती. असे अनेक विचारवंतांनी म्हटलं आहे. युवा घडवण्याचे त्यांचं लिखाण आणि त्यांच्या विचार आकर्षित करणारे आहे. आजही ते युवा पिढीचे मार्गदर्शक म्हणूनच ओळखले जातात.
कोलकात्यात शिमला नामक मोह्ल्यात् सुरेंद्रनाथ मित्र यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलविले होते. त्यावेळी कुणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांना आपल्या शेजारी राहणाऱ्या नरेन्द्रला बोलावून आणले. इ.स. १८८१ च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्याचे गायन ऐकून संतुष्ट झाले. त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले. सूक्ष्म योगदृष्टीच्या साहाय्याने श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांचा महिमामय अति उज्ज्वल भावी काल पाहू शकले होते म्हणूनच ते नरेंद्राकडे आकृष्ट झाले, असे दिसते.
त्यांच्या चेहेऱ्यावर एक विलक्षण प्रकारचे तेज होते. त्यांना पाहिले तरी प्रसन्न वाटावे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.४ जुलै १९०२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा