बिहारमध्ये तेजस्वी की नितीश…? आज होणार निर्णय…

बिहार, १० नोव्हेंबर २०२०: बिहारमधील तीन-टप्प्यातील विधानसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आज राज्यातील सर्व २४३ विधानसभांमध्ये पडलेल्या मतांची मोजणी होणार आहे. मतदानाच्या सर्व टप्प्यातील मतमोजणी आज सकाळी ८ वाजता सुरू होईल, त्यानंतर पुढील पाच वर्ष बिहारमध्ये कोण सत्तेत असेल हे निश्चित होईल. महत्त्वपूर्ण म्हणजे बिहारमध्ये मतदान तीन टप्प्यात (२८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर) झाले.

निवडणूक आयोगानं राज्यातील २४३ विधानसभा जागांच्या मोजणीसाठी बिहारच्या ३८ जिल्ह्यात ५५ मतमोजणी केंद्रांची स्थापना केली आहे. बिहार राज्य निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार पूर्व चंपारण, सिवान, बेगूसराय आणि दोन नालंदा, बांका, पूर्णिया, भागलपूर, दरभंगा, गोपाळगंज, सहरसा येथे प्रत्येकी तीन मतमोजणी केंद्रं सुरू केली आहेत. ५५ मतमोजणी केंद्रामध्ये ४१४ हॉल आहेत.

मोजणी केंद्रांवर पोस्टल बॅलेटची प्रथम गणना केली जाईल. पोस्टल बॅलेट मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं बिहारमध्ये अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. मतमोजणी दरम्यान, फक्त पोस्टल बॅलेट प्रथम मोजल्या जातील.

कोरोना प्रोटोकॉलमुळं उशीर होण्याची शक्यता

बिहारमधील मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं कडक तयारी केली आहे. यावर्षी निवडणूक आयोग कोरोना संसर्ग लक्षात घेऊन बरीच खबरदारी घेत आहे. तथापि, असा अंदाज आहे की यावेळी सुरुवातीच्या ट्रेंडच्या आगमनामध्ये थोडा उशीर होऊ शकेल. कारण, यावेळी कोरोना लक्षात ठेवून बर्‍याच गोष्टी बदलल्या गेल्या आहेत. यावेळी निवडणूक आयोगानं मतमोजणीत भाग घेणाऱ्या सर्वांसाठी फेस मास्क अनिवार्य केलं आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतमोजणीच्या टेबलवर नेण्यापूर्वी ईव्हीएमचे कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटची स्वच्छता केली जाईल. त्याच वेळी मतदानादरम्यान मतदारांची संख्या नियंत्रित करण्यासाठी बूथची संख्याही वाढविण्यात आली होती, त्यामुळं निवडणुकीच्या निकालास उशीर होऊ शकेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा