टेकडीफोडकडे महसूल विभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; दरड कोसळण्याची भीती

पुणे शहराच्या दक्षिणेकडील डोंगर उतारावर असलेल्या मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी अशा गावांमध्ये अनधिकृतपणे टेकडीफोड आणि उत्खनन सुरू आहे. यामुळे येथे दरड कोसळण्याची भीती वाढली असून, स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

‘इर्शाळवाडी’ आणि ‘माळीण’ सारख्या दुर्घटना घडूनही महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. हवेली तहसीलदारांच्या आदेशानंतर पाहणी झाली खरी, पण कोणतीही ठोस कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ही कारवाई केवळ नावापुरतीच होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनधिकृत टेकडीफोडमुळे नैसर्गिक नदी-नाले नष्ट होत आहेत, ज्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवन दोन्ही धोक्यात आले आहेत. भूमाफियांच्या अशा कृत्यांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून, प्रशासनाने यावर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले